आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतूचा मक्ता रद्द करण्याची तहसीलदारांची शिफारस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सह्यांसाठी पाठवायच्या 500 हून अधिक दाखल्यांचे ढिगारे सेतू कार्यालयातच आढळून आले. सेतूचालकाच्या बेजबाबदारपणामुळेच नागरिकांना दाखल्यासाठी त्रास होत आहे. कराराप्रमाणे सेतू कार्यालयात सुविधा न दिल्याने 18 नोटिसा दिल्या आहेत. तरीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे सेतूचालकाचा ठेकाच रद्द करण्याची शिफारस तहसीलदार अंजली मरोड यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. आता जिल्हाधिकार्‍यांची जणू परीक्षा आहे.

मागील दोन महिन्यांपासून दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी थेट निवासी उपजिल्हाधिकार्‍यांपर्यंत पोहोचल्या होत्या. याप्रकरणी प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी तहसीलदार अंजली मरोड यांना नोटीस दिली होती. नोटिसीनंतर तहसीलदार मरोड यांनी सेतूमधील अनियमितता समोर आणली. मरोड यांच्या नोटिसींना सेतूचालकांनी कसलीच उत्तरे दिली नव्हती. सेतू कार्यालयात कर्मचार्‍यांच्या मदतीने पेंडन्सी कामे पूर्ण केली जाणार आहेत.

त्रास देताहेत
आमच्या कामकाजात पारदर्शकता व नियोजन आहे. वरिष्ठ असल्याने तहसीलदारांनी नोटिसा दिल्या आहेत. कराराप्रमाणे कर्मचारी आहेत. दाखले पाठवणे, याद्या देणे याविषयीचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. उत्तर तहसीलकडून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार आहे.’’ रणजितसिंह ठाकूर, सेतू संचालक

नियमांचे उल्लंघन केल्याने 50 हजारांचा दंड
सेतूचालकांनी कराराप्रमाणे काम न केल्याने व दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याने तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांनी 50 हजार रुपयांचा दंड केला होता. तरीही सेतूच्या कामकाजात सुधारणा नव्हती. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. नोटिसा देऊनही कामकाजात सुधारणा होत नसल्याचे तहसीलदार मरोड यांनी सांगितले.