आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरातील दगडफेकीत सातवर्षीय चिमुकल्याचा बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जागेच्या वादातून पाच जणांनी केलेली मारहाण आणि दगडफेकीत एका सातवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास अक्कलकोट रस्ता येथील बालाजीनगर विटभट्टीजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी चौघांना अटक झाली आहे.

गणेश शिवार भोसले (वय सात) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. झुंबरबाई भोसले (वय 45), लक्ष्मीबाई भोसले (वय 30, आडवानगळ), निर्मला सिद्धेश्वर भोसले (वय 30), चिंगूबाई शिवार भोसले (वय 30, सर्व रा. बालाजी नगर, बोळकवठेनगर) हे जखमी झाले आहेत. रमेश रघुनाथ चव्हाण, नारायण सूतकर भोसले, सूरज रमेश चव्हाण, रमेश राहुल चव्हाण (सर्व रा. सेटलमेंट कॉलनी, सलगरवस्ती परिसर, सोलापूर) या चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू मधू चव्हाण (सर्व रा. सेटलमेंट कॉलनी, सलगर वस्ती परिसर, सोलापूर) हा फरार झाला असून, या पाच जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. झुंबरबाई भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

झुंबरबाई भोसले यांचा रमेश, नारायण आणि सूरज यांच्यासोबत जुनाच वाद आहे. रविवारी रात्री बालाजीनगरातील अंगणात झुंबरबाई, त्यांची सून व सात वर्षांचा नातू गणेश हे सर्वजण झोपले होते. पहाटे दोनच्या सुमाराला संशयित रमेश व नारायण या दोघांनी मिळून ‘तू निराधार कार्डामुळे माझे घर लुटले आहे’ असे म्हणत झोपलेल्या तिघांवर तुफान दगडफेक केली. मारहाण केली. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. अन्य चौघेजण जखमी झाले आहेत. झुंबरबाई भोसले व त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करतात.