आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभूराजे महानाट्य, रयतेचा राजा सोलापूरकरांसमोर उभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पुरंदर किल्ल्यावर शंभूराजेंचा जन्म झाला. आनंदित होऊन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, ‘‘साक्षात महादेवच भोसले घराण्यात आलाय. त्याचे नाव शंभूराजे ठेवूयात. स्वराज्याचे स्वप्न पाहणार्‍या माँसाहेब जिजाऊ शंभूराजेंना वाढवण्यात रमल्या. सह्याद्रीचा हा छावा युद्धनीतीत तरबेज झाला. त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त करत जिजाऊ म्हणाल्या, ‘‘स्वराज्य मंदिरात कळस चढवण्याचे काम करा..!’’

लोकमंगल प्रतिष्ठान प्रस्तुत शिवस्वराज्य प्रतिष्ठान (पुणे) निर्मित ‘शिवपुत्र शंभूराजे’ या महानाट्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. जुळे सोलापुरातल्या मैदानात किल्ल्याच्या भव्य प्रतिकृती असलेल्या मंचावर रयतेचा राजा अवरतला होता. हत्ती, घोडे मंचासमोरून धावले. तलवारी घेऊन मावळेही सहभागी झाले होते. संभाजी महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे होते तर छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत मयूर घोलप. सहा दिवस चालणार्‍या या महानाट्यात शंभूराजेंचा खरा इतिहास उलगडणार आहे.

पुरंदर किल्ल्यावर शंभूराजेंचा जन्म, बारसे, शिवराज्याभिषेक, औरंगजेबाच्या तावडीतून सुटका, त्र्यंबकराव वाडकरांच्या कन्या गोदाचे अपहरण आणि शंभूराजेंना बदनाम करण्याचे कारस्थान ही दृश्ये मंचावर सादर झाली. आई तुळजाभवानीच्या साक्षीने हा इतिहास सोलापूरकरांसमोर उभा राहिला. मराठय़ांच्या कर्तबगारीने शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे केले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

तीनशे कलावंतांचा संच
बुलंद किल्ला, दर्शनी भागात आई तुळजाभवानी, फिरणारे बुरूज अशा भव्यदिव्य रंगमंचावर तीनशे कलावंतांचा ताफा हे महानाट्य सादर करत होता. शंभूराजे जन्मले. सोन्याच्या पाळण्यात घालून त्यांचे बारसे करण्यात आले. त्यावेळी उपस्थित समुदाय शिवकालीन घटनांचे साक्ष देणारा ठरला. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळाही त्याच ताकदीने झाला. तोफा उडाल्याच; आकाशातील तारेही जणू गळून पडले.