आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- ‘‘छत्रपती शिवाजी महाराज मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण संपलेले होते. त्यापूर्वीची पावणेदोन वर्षे दीडशे ते पावणेदोनशे जणांची टीम घर-दार विसरून चित्रीकरणात मग्न होती. शेवटच्या भागातील शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे चित्रीकरण संपले आणि आपण रिते झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर मेकअप रूमचा दरवाजा बंद करून मी अर्धा तास ढसाढसा रडलो..’’ या मालिकेत शिवरायांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे सांगत होते.
शिवपुत्र शंभूराजे महानाट्याच्या प्रयोगानिमित्त डॉ. कोल्हे सध्या सोलापुरात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी संपादकीय विभागातील कर्मचार्यांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मालिकेतील शिवरायांची भूमिका, महानाट्यातील शंभूराजांच्या भूमिकेसह या क्षेत्रातील आजवरच्या प्रवासाचा पटच त्यांनी उलगडला. डॉ. कोल्हे यांनी सांगितलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत : ही मालिका करताना मी दोन वर्षे दिग्दर्शक हेमंत देवधर यांच्याकडे कोणताही हट्ट केला नाही. राज्याभिषेकाच्या प्रसंगात सिंहासनावर बसल्यानंतर पुन्हा टेक देणार नाही, हा हट्ट पुरवण्याची मागणी केली. देवधरांनी तो मान्यही केला. सिंहासनावर बसल्यानंतर मी भारावून गेलो. मन भरून आले होते. ते व्यक्त करण्यासाठी कोणतेही शब्द नव्हते. चित्रीकरण संपले. रितेपणाची जाणीव झाली. आता पुढे काय, असा प्रश्न पडला. मेकअप रूममध्ये दोन तास स्वत:ला कोंडून घेऊन ढसाढसा रडलो. शिवरायांची ओळख शाळेत गेल्यानंतर होते. मी मूळचा जुन्नरचा असल्याने लहानपणापासूनच शिवेनरीच्या कुशीत खेळलो. नातेवाईक आले की त्यांच्यासोबत मी गडावर जायचो. त्यामुळे शाळेत जाण्याअगोदरच शिवरायांची ओळख झाली. पुढे विश्वास पाटील यांच्या संभाजी या कादंबरीने मला संभाजी राजांचे वेड लावले. त्यादरम्यानच मला कलावैभवच्या नाटकातील शंभूराजांची भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यानंतर इतिहास जाणून घेण्याचे वेड लागले, ते पूर्ण केले. शिवाजी महाराज हे कोणत्याही प्रसंगात सुवर्णमध्य काढणारे मुत्सद्दी होते. शंभूराजे हे भावनिक आंदोलनाचे एक टोक होते. या दोन्ही भूमिकांमध्ये एक साम्य होते. ते म्हणजे ते दोघेही द्रष्टे होते. ऐतिहासिक भूमिकांचा शिक्का माझ्यावर पडू पाहत होता. रामायण मालिकेतील कलाकारांसारखी अवस्था होते की काय अशी भीती होती. शिवरायांची सर्वात उत्कृष्ट भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी साकारली आहे. तरीही ते त्या तेवढय़ाच भूमिकेत अडकले नाहीत. हा विचार आला आणि मी निश्चिंत झालो.
कन्येसाठी घोडा व्हावे लागते..
मालिका, महानाट्यामध्ये मी प्रेक्षकांसमोर शिवराय, संभाजीराजेंच्या भूमिकेत घोड्यावर येत असलो तरी घरी गेल्यावर माझ्या कन्येसाठी मला घोडा व्हावे लागते. त्यावेळी मी अमोल कोल्हे, अभिनेता नव्हे तर माझ्या मुलीचा बाबाच असतो. मी डॉक्टर (एमबीबीएस) असल्याने माझे बहुतांश मित्र वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. त्यांच्यात मी सहजपणे मिसळतो. घरी भाजी संपली की ती आणण्यासाठी बाजारात जावे लागते. कलावंताला स्वीच ऑन - स्वीच ऑफ होता आले पाहिजे. एकाच पठडीत काम केले तरी वाट्याला आलेल्या भूमिकांना न्याय देता आला पाहिजे.
तो क्षण बदलला असता
अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणे होते. इतिहास बदलता आला असता तर तुम्ही काय केले असते, असा प्रश्न मला विचारला जातो. संभाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू बदलला असता, असे माझे उत्तर असते. संभाजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता तर देशाचा इतिहास वेगळा असता. पुढील दीडशे वर्षे आपल्या कदाचित गुलामगिरीत काढावी लागली नसती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.