आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद बनसोडे यांच्या प्रचाराला मित्रपक्षांनी मारली दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महायुतीतील मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीत भाजपचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अँड. शरद बनसोडे यांची मोहोळ तालुक्यापासून प्रचाराचा शुभारंभ झाला. यानिमित्त बुधवारी मोहोळच्या नागनाथ मंगल कार्यालयात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजिला होता. मात्र, शिवसेनेसह रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात भाजपच्या पदाधिकार्‍यांकडून शिवसेनेच्या विरोधात प्रचार सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टाकल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. तर भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचे रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रासपच्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे, तालुकाध्यक्ष दशरथ काळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अरविंद माने, कमलेश वाकडे, महिला आघाडीच्या रंजना जाधव, आश्लेषा कारंडे, अविनाश पांढरे, धनंजय मोहोळकर, अमोल डोळसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अँड. बनसोडे म्हणाले, ‘‘सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणार्‍या काँग्रेस आघाडी सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चित करून देशात भाजप महाआघाडीचे सरकार सत्तेवर आणा. कारण काँग्रेस हे सर्वसामान्यांचे नव्हे तर, ते उद्योगपती आणि कारखानदार यांच्या हातातील बाहुले आहे. सोलापूर हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही शहराचा सर्वांगीण विकास झाला नाही. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोहोळच्या विकासाची आश्वासने दिली. मात्र, ती पूर्ण केली नाहीत. त्यामुळे ही निवडणूक परिवर्तनाची आहे.