आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतर्गत धुसफूस: साहेब सोलापुरात, दादा मुंबईत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शुक्रवारी दुपारी तीन दिवसांच्या दौर्‍यावर सोलापुरात दाखल झाले. त्याचेवळी पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे मुंबईत होते. मोहिते-पाटलांपैकी कोणीही स्वागताला नव्हते. दुसरीकडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करत पवारांचे जोरदार स्वागत केले.

पवार शुक्रवारी सायंकाळी येतील असे त्यांच्या शासकीय दौर्‍यात नमूद होते. मात्र, दुपारी 3.40 वाजता बारामतीहून हेलिकॉप्टरने त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. पालकमंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार दिलीप माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर मनोहर सपाटे, कय्युम बुर्‍हाण यांच्यासह शासकीय अधिकार्‍यांची विमानतळावर उपस्थिती होती.

दरम्यान, विमानतळाबाहेर शेकडो कार्यकर्ते हातात पक्षाचा झेंडा घेऊन स्वागतासाठी सज्ज होते. पवार विमानतळाबाहेर पडताच घोषणाबाजी करण्यात आली. रस्त्यावर ठिकठिकाणी कार्यकर्ते गर्दीने थांबून होते. त्यांचेही स्वागत पवारांनी स्वीकारले.

अशी रंगली होती चर्चा
पवारांच्या दौर्‍याच्या राजकीय अजेंड्याबाबत पक्षातील नेतेही अनभिज्ञ आहेत. तीन दिवसांच्या दौर्‍यात ते येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय फिल्डिंग लावतात याकडे लक्ष लागले आहे. विमानतळावर उपस्थित नेत्यांमध्ये मोहिते-पाटलांपैकी कोणीही उपस्थित नव्हते. काही अफवाही पसरवत होते. काही दिवसांपूर्वी मोहिते-पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी सह्यांची मोहीम राबवली होती. या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात येणार होते. त्यासाठी विजयसिंह आणि रणजितसिंह मुंबईत थांबले होते. शरद पवार सोलापुरात असताना दोघेही मुंबईत कसे काय थांबले?, याबाबत चर्चा रंगली होती.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देण्यासाठी आम्ही मुंबईत गेलो होतो. मात्र, मुख्यमंत्र्यांना अन्य महत्त्वाची कामे असल्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. शरद पवार सोलापुरात आल्यानंतर मी स्वागताला नव्हतो, याबाबत वेगवेगळी चर्चा झाल्याचे ऐकले, त्यात काहीही अर्थ नाही. उद्याच्या कार्यक्रमांत मी पवारांसोबत उपस्थित आहेच. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री

धनंजय मुंडेंनी घेतली भेट
भाजपतून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले धनंजय मुंडे यांनी शासकीय विर्शामगृह येथे पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांची काय चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही. मुंडे यांनी नुकताच विधानपरिषदेतील भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती.

अपंगांनी दिले निवेदन
शासकीय विर्शामगृहावर पवारांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळे दाखल झालेली होती. पक्षाच्या तालुकाध्यक्षांकडून तालुक्यातील स्थिती जाणून घेतली. रात्री अपंगांचे एक शिष्टमंडळ भेटण्यासाठी शासकीय विर्शागृहावर आले होते. पवार यांनी स्वत: बाहेर येऊन अपगांची भेट घेतली व त्यांचे निवेदन स्वीकारले.