आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress Party, Sugar Factory, Divya Marathi

ज्यांचा गुंठाभर ऊस पिकत नाही, ते लोक कारखाने बंद पाडताहेत - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेंभुर्णी - आंदोलनांमुळे मुंबईतल्या कापड गिरण्या बंद पडल्या आणि 2 लाख कामगार देशोधडीला लागले. आता ज्यांचा गुंठाभर ऊस पिकत नाही, ते लोक साखर कारखाने बंद पाडत आहेत. या लोकांमुळे भविष्यात राज्यातील साखर कारखानदारीची परिस्थिती मुंबईतल्या कापड गिरण्यांसारखी होईल. येथील ऊस उत्पादक उद्ध्वस्त होईल, अशा लोकांना खड्यासारखे बाजूला काढा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. विजयसिंह मोहिते, आमदार बबनराव शिंदे, आमदार भारत भालके, आमदार शामल बागल, आमदार दीपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, माजी आमदार धनाजी साठे, शिवाजी सावंत, भाई एस. एम. पाटील, माढा पंचायत समितीचे सभापती रणजितसिंह शिंदे, जिल्हा परिषदेचे सभापती शिवाजी कांबळे, कल्याणराव काळे, राजूबापू पाटील, मोहन देशमुख आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘आंदोलनामुळे उसाचे वेळेवर गाळप न झाल्याने साखरेचे उत्पादन घटते. साखर कारखानदारी ही ऊस उत्पादकांच्याही मालकीची आहे. मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी दत्ता सामंत नेते होते. त्यांनी संप, आंदोलने केली. त्यात 120 कापड गिरण्यांतील 2 लाख कामगार सहभागी झाले. आता केवळ 8 हजार कामगार काम करीत आहेत.’
पवारांनी महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता टीका केली. तिकडे धुळ्यामध्ये शेतकर्‍यांची फसवणूक केली. त्यांच्यावर कोर्टाने खटले भरले. असे उद्योग केलेले लोक आता इकडे कसले उद्योग करणार.’ पवार म्हणाले, ‘आज मोदींचा प्रचार करणारे लोक यापूर्वी मी लोकसभेत आल्यानंतर गळ्यात कांदे घालून गोंधळ करायचे. यावेळी मी कांद्याचे दर वाढवले म्हणून टीका झाली. मी कांद्याचे दर वाढवले नाही तर शेतकर्‍याच्या मालाला किंमत मिळवून दिली. यापुढील काळात शेतकर्‍यांसाठी टीका करून घ्यायला तयार आहे.’
.. म्हणूनच विजयसिंहांना संधी
‘यशवंतराव चव्हाणांनी माझ्यासारख्याला संधी देताना पक्षाच्या सभेत राज्याच्या राजकारणात नवी पिढी तयार करतोय, असे सांगितले होते. आता मी वयाची 74 वर्षे पूर्ण केली. त्यामुळे नव्या नेतृत्वाला संधी देण्याची जबाबदारी माझ्यासारख्यावर आहे. राज्यात नगर, रावेर, जळगाव, अमरावती आदी ठिकाणी तरुणांना संधी दिली आहे तर काही ठिकाणी ज्येष्ठांना संधी दिली आहे. एकीकडे तरुणांना संधी देत असताना लोकसभेत अनुभवी लोक असले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे. ही दुहेरी भूमिका ठेवून विजयसिंहांना माढय़ातून उमेदवारी देण्यात आली आहे.’
दिवाळीच्या हप्त्यासाठी सदाभाऊ लागेल का?
आमदार शिंदे म्हणाले, ‘पवारांनी 40 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाडव्याला साखरेचे दर 3100 रुपये क्विंटलप्रमाणे झाले. आता साखरेचा दर वाढतोय. त्यामुळे दिवाळीचा हप्ता देण्यासाठी सदाभाऊ लागेल का?’ असा सवालही त्यांनी केला. पवारांनी माढा मतदारसंघासाठी खूप काही केले आहे. विजयसिंह आपले हक्काचे खासदार असतील. माढय़ातील उर्वरित विकासकामे आता त्यांच्या मदतीने पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.
संजय शिंदे गैरहजर, फार्म हाऊसवर गुप्तगू
आमदार बबनराव शिंदे यांनी सभेचे नियोजन केले होते. मात्र, त्यांचे बंधू, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे अनुपस्थित होते. शिंदे सध्या परदेश दौर्‍यावर असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. शरद पवारांनी सभा संपल्यानंतर संजय शिंदे यांच्या टेंभुर्णीजवळील फार्म हाऊसवर सर्व नेत्यांना बोलावून बैठक घेतली. या ठिकाणीच त्यांनी माढा मतदारसंघाचा आढावा घेतला.