आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता हवी - शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पत्रकारिता ही लोकांचे प्रश्न मांडणारी संस्था व्हावी, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. दुर्बलांना प्रेरणा देणारी, संकटांवर मात करणारी पत्रकारिताच सक्षम समाजाची निर्मिती करू शकेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, महापौर अलका राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी, खासदार पद्मसिंह पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्रातल्या पत्रकारितेला मोठी परंपरा असल्याचे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, ‘बाळशास्त्री जांभेकरांनंतर टिळक, नानासाहेब परुळेकर, आचार्य अत्रे, बाबा दळवी, बाबूराव जक्कल, रंगाण्णा वैद्य अशी दिग्गज मंडळी होऊन गेली. रंगण्णांचे अग्रलेख आम्ही आवर्जून वाचायचो. सोलापूरच्या भल्याची, विकासाची पत्रकारिता त्यांनी केली.’

अध्यक्षीय भाषणात श्री. शिंदे म्हणाले, ‘विषयाच्या खोलात जाऊन चिंतन-मनन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत खरी पत्रकारिता होणार नाही. नव्या पत्रकारांमध्ये उत्साह दिसतो. नवा देश घडवण्याची ऊर्मी दिसून येते. समाजातील वैगुण्यांवर बोट ठेवून त्यांनी पत्रकारिता केल्यास जरूर समाज बदलू शकेल.’

राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी प्रास्ताविक केले. नितीन पात्रे यांनी आभार मानले.

आधी दादा, नंतर सुप्रीम
या कार्यक्रमात पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी जागेचा विषय आला. शिंदे मुख्यमंत्रिपदी तर विजयदादा उपमुख्यमंत्री होते तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित असल्याचे संघाचे अध्यक्ष केत यांनी सांगितले. त्यावर बोलताना मोहिते-पाटील यांनी पवार आणि शिंदे यांच्याकडे निर्देश करत, दोघांनी जर मुख्यमंत्र्यांना सांगितले तर लगेच काम होईल, असे म्हणाले. त्यांना उत्तर देताना श्री. पवार म्हणाले, ‘आम्ही दोघे केंद्रात आहोत. राज्याच्या अखत्यारित जे प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम दादा तुमचेच आहे. त्यानंतर आम्ही आहोत ना सुप्रीम..’