आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेळगी येथील जि.प. मुलींचे वसतिगृह नव्हे, समस्यागृह...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- तुंबलेले ड्रेनेज, दरवाजा मोडलेले स्वच्छतागृह, पाण्याची भीषण टंचाई, कायस्वरूपी सुरक्षारक्षक नाही, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थिनींना प्रवेश अशा एक ना अनेक समस्या शेळगी येथील जिल्हा परिषदेच्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात गुरुवारी आढळून आल्या.

जिल्हा परिषद सदस्या सीमा पाटील, कमल कोळेकर व निर्मला पाटील यांच्या पथकाने गुरुवारी शेळगी येथील मुलींच्या वसतिगृहास अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी विद्यार्थिनींनी सदस्यांपुढे अडचणींचा पाढा वाचला. वसतिगृहामध्ये 75 जणींना प्रवेशाची क्षमता आहे. पण, पदाधिकार्‍यांनी तब्बल 150 जणींना प्रवेश दिला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून त्याची नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरली. ड्रेनेज तुंबल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून परिसरात पडलेला

बांधकामाचा राडारोडा, झुडपांमुळे चार-आठ दिवसाला साप निघतात. स्वच्छता कर्मचारी आठवड्यातून एकदाच येतो, तोही दारूच्या नशेत. दिवसा सुरक्षारक्षक नसल्याने भीती वाटत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. वसतिगृहाच्या परिसरातील कूपनलिकेवरील विद्युतपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने पाण्यासाठी भटंकती करावी लागत आहे. वसतिगृह अधीक्षक एम. एम. हिरमेठ यांनी प्रशासनाकडे वारंवार सुरक्षारक्षक व नियमित स्वच्छतेबाबत कळवले आहे. पण, त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नसल्याची सांगितले.

सुविधा न मिळाल्यास तक्रार
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थिनींना वसतिगृहात सुविधा न मिळणे हे चुकीचे आहे. मुलींच्या आरोग्यासह, सुरक्षितता व प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. तातडीने त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्वरित सुविधा न मिळाल्यास अधिकार्‍यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.’’
-सीमा पाटील, सदस्य, जिल्हा परिषद