आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संघटना पुन्हा बांधणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - शेतक-यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये. प्रत्येक आंदोलन करताना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतक-याचा कसा फायदा होईल, याचा विचार करून संघटनेने काम केले पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारच्या शेतकरीहिताच्या संघटनेची निर्मिती करण्यासाठी येत्या ८ व ९ नोव्हेंबर रोजी पंढरपुरामध्ये बैठक होणार आहे. अशी माहिती, शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या बी.जी.काका पाटील आणि पंजाबराव पाटील यांनी दिली. नव्याने संघटना बांधणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली.

पाटील म्हणाले, “विधानसभा निवडणुकीवेळी कारखानदारांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश देऊन ख-या कार्यकर्त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून डावलण्यात आले. त्यामुळे संघटनेत फूट पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेली मंडळी निष्ठावान व तळमळीने काम करणारी आहे. या कार्यकर्त्यांच्या बळावर आता आम्ही नवीन शेतकरी संघटनेची स्थापना करणार आहोत. आमचे आंदोलन नुसते उसापुरते असणार नाही तर वीज, खते, पाणी आणि मायक्रोफायनान्ससह इतर प्रश्नांसाठी आमचा लढा असेल आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र व राज्य शासनाचे अनुक्रमे देशातील तसेच राज्यातील पुढील पंचवार्षिक कृषी धोरण कसे असेल यासाठी देखील शासनाबरोबर आमचा लढा राहणार आहे. सरकार नावाची निर्जीव व्यवस्था असते. त्यामध्ये शेतकरी चळवळीच्या माध्यमातून ख-या अर्थाने जीव ओतण्याचे संघटनेच्या माध्यमातून काम झाले पाहिजे. यासाठी तशा धाटणीच्या बांधणीच्या संघटनेच्या निर्मितीसाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही बी.जी.पाटील व पंजाबराव पाटील यांनी सांगितले.

चौथ्या संघटनेचा उदय होणार
शेतक-यांच्या मालाला योग्य दाम मिळण्यासाठी सुरुवातीला शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनादेखील शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असते. यामध्येच आता या चौथ्या शेतकरी संघटनेचा उदय होणार आहे.

संघटनेचे नाव बैठकीत ठरणार
येथील मुरारजी कानजी धर्मशाळेत येत्या ६ व ९ नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांची व कार्यकर्त्यांची दोन दिवस बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी चर्चासत्रांचेदेखील आयोजन केले जाणार आहे. यामध्ये आमच्या शेतकरी संघटनेचे नाव काय असावे, यासह इतर धोरणात्मक पिर्णय, बाबी ठरविण्यात येणार आहेत. असेही बी.जी.पाटील व पंजाबराव पाटील यांनी सांगितले.