आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्यांवर मात करतो, तोच खरा यशस्वी- शिव खेरा यांचा संदेश

8 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

सोलापूर- जीवनात समस्या नसणारा माणूस कधीही यशस्वी होणार नाही. समस्यांवर मात करतो, तोच खरा यशस्वी होतो. यशाचे मूल्यमापन किती वेळा जिंकला यावर होत नाही, तर किती वेळा हरला आणि किती वेळा पडला, यावर होत असते. जिंकणारे त्या कामाची सवय लावून घेतात, जे हरणारे कधीही करू शकत नाहीत. सकाळी लवकर उठणे आणि कठोर पर्शिम यातूनही जीवन घडते. चांगल्या सवयींनी चांगले चारित्र्य टिकवता येते. वाईट सवयींनी मात्र जगणेच कठीण होऊन जाते, अशी यशाची मौलिक सूत्रे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यवस्थापन तज्ज्ञ शिव खेरा यांनी शनिवारी येथे दिली.

‘दिव्य मराठी’तर्फे नागेश करजगी ऑर्किड कॉलेजच्या पटांगणात आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. ऑर्किड कॉलेज आणि इंद्रधनु गृहप्रकल्प प्रायोजक होते. मानवी जीवन, जगण्यातल्या समस्या, त्यावर मात करण्याचे उपाय, संत आणि महात्म्यांची कार्ये आणि वर्तमान जीवन पद्धती यांचा वेध घेत त्यांनी सोलापूरकरांशी संवाद साधला.

परमात्म्यापुढे प्रार्थना करा, ‘हे परमेश्वरा मला सर्व काही दे. जे मी बदलू शकत नाही, अशा गोष्टीही दे. तुझी देणगी म्हणूनच त्यांचा स्वीकार करेन. एखादी गोष्ट बदलणे शक्य आहे की नाही, हे ठरवण्याची बुद्धी दे. बदलू शकत असेन तेव्हा सर्वशक्तीनिशी बदल घडवण्याचा उत्साह आणि उमदेपणाही दे.

खोट्या गोष्टी खोट्याच!
घरातील लहान मूल मोठय़ांचे अनुकरण करत असते. टेलिफोन वाजल्यानंतर घरात असूनही ‘पापा घरमे नही है’ असे सांगण्यास प्रवृत्त करतो. शेवटी मुलाला त्याची सवय लागते. मोठेपणी तो बिनधास्त खोटे बोलतो. शेवटी दोन रुपयांत आईला विकायला निघतो. या स्थितीला जबाबदार कोण? खरे बोलाल तर समोर कोणी नसूनही अभिमान बाळगाल. खोटे बोलाल तर समोर कोणी नसतानाही स्वत:ला हीन लेखाल. ही हीनता कुटुंबाला, समाजाला आणि पर्यायाने देशालाच लांच्छनास्पद असते.

नोकरदारही खोटं बोलतील
कर्मचार्‍यांनाही काही मालक मंडळी खोट बोलण्यास भाग पाडतात. धनादेश देण्या-घेण्याबाबत कर्मचारी टेलिफोनवर खोट्या बाता करतात. शेवटी मालकाशीही खोटे बोलतात. आपसांत विश्वास नसतो. एकमेकांकडे संशयाने पाहिले जाते. अशा स्थितीतून संबंधित काय कमावणार आहे? पारदर्शी व्यवहार करा, सत्य बोला, सत्याने वागा, सत्याला जागा. पैसा मिळवू शकला नाही तरी आयुष्यात खूप काही मिळवाल.

धाडसी निर्णय घ्यावेत
कुणाच्या पोटी जन्मायचे, हेच आपल्या हातात नाही तर जन्माला आल्यानंतर तरी समस्यांवर खदखद का? आव्हानांना सामोरे जात काही धाडसाचे, चांगले निर्णय घ्यावेच लागतील. चांगले निर्णय यशाकडे नेतात आणि वाईट निर्णय वाईटाकडेच घेऊन जातात. कसे वागावे, कसे वावरावे आणि कसे लोकांसमोर यावे, याचे काही अलिखित नियम आहेत. त्या अंगीकाराल तर यशस्वी जीवन जगू शकाल.’’ शिव खेरा, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ज्ञ

 • कितीही पैसा मिळवला तरी विश्वास मिळवणे फार महत्त्वाचे. जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रेम म्हणतात; परंतु विश्वासाइतकी मोठी गोष्टी कुठलीच नाही.
 • इष्र्या, द्वेषाने लोक एकमेकांचे पाय ओढतात. त्यामुळे त्यांच्यात हीनतेची भावना निर्माण होते. त्यातून दुराचार जन्मास येतो. तो आपल्यालाच खाऊन टाकतो.
 • चांगले निर्णय घेण्यास आपणाला स्वातंत्र्य आहे. परंतु त्या निर्णयानेच आपल्यावर ताबा मिळवला तर स्वातंत्र्य संपुष्टात येऊ शकते, हे लक्षात ठेवावे.
 • मानवी जीवनात व्यापारी समस्या नाहीत तर व्यावहारिक समस्या अधिक आहेत. चांगल्या दृष्टिकोनातून त्या सोडवण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत.
 • जे काम करू शकत नाही किंवा आपल्या हातने होत नाही, त्यामागे काही सिद्धांत असतात. त्यातून काही जण विक्रम मोडतात तर काही जण स्वत:ला तोडून घेतात.
 • सकारात्मक विचारांतून जगातील सर्व गोष्टी मिळवू शकतो, हे खरे नाही. कृतिशील मेहनतीनेच यशस्वितेच्या जवळ जाऊ शकतो, हेच खरे.
 • ‘समयसे पहले आणि भाग्यसे अधिक कुछ नही मिलता’ हे वाक्य खोटे आहे. इच्छाशक्ती, निर्धार, जिद्द या गोष्टींनी वेळेच्या आत खूप काही मिळवता येते.
 • आयुष्यात यशस्वी व्हायचेच असल्यास तर दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक पात्रता प्राप्त करणे आणि दुसरी म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती मिळवणे.
 • आपण भारतीय काही करून जात नाही, काही होऊन जातो. स्वामी विवेकानंद, गुरुनानक यांनी हेच काम केले. त्यांचा आदर्श नेहमीच समोर ठेवा.
 • माणूस जीवनात जेवढा पवित्र असतो, तेवढीच त्याची ताकद असते. अशा ताकदीने प्रयत्न करणार्‍या माणसाचा कितीही अडचणी आल्या तरी पराभव कधीच होत नसतो.

देशासाठी हे करा.!
शिव खेरा म्हणतात, विश्वासाइतकी मोठी गोष्ट कुठलीच नाही

 • जगाच्या नकाशावर देशाचे अस्तित्व टिकवण्यासाठी जाती-धर्मावरील आरक्षण संपवा. आर्थिक निकषांवर ते देत वंचितांना मूळ प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करा.
 • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘जय हिंद’चा नारा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. या घोषणेचा विसर पडता कामा नये. एकमेकांना भेटल्यानंतर ‘जय हिंद’च म्हणा.!
 • नकारात्मक मताचा हक्क आलेला आहे. पण, 50 टक्के मिळाले तर सर्वांची उमेदवारी रद्द करावी. तशी तरतूद करण्यासाठी सर्वोच्च् न्यायालयात जाणार आहे.
 • राजकारणात चांगल्यांना आणायचे असेल तर गुन्हेगारांना बाजूला ठेवावे लागेल.