आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Celebrate It 50th Foundation Anniversary

शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव: ‘उसन्या अवसाना’मुळे बुरूज अस्थिरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणाच्या परिघाबाहेर असलेल्या समाजघटकांना राजकीय प्रवाहात बळ देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. ओबीसी, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर दलित वर्गातील मावळ्यांच्या खांद्यावर भगवा जोमाने फडकू लागला. शिवसेना सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना पन्नास वर्षांतील शिवसेनेच्या स्थानिक राजकीय जडणघडणीचा हा धांडोळा...
सुवर्णमहोत्सवी वाटचालकरणा-या शिवसेनेची सोलापूरची आजवरची वाटचाल पाहिली तर उसन्या अवसानावरच चाललेली दिसते. त्यामुळे मूळचे मावळे आजही मावळे बनूनच राहिले. त्यामुळे सोलापूरच्या शिवसेनेत तरी आयाराम, गयाराम संस्कृती वाढल्याचे चित्रच शहर जिल्ह्यात दिसते आहे. त्यामुळेच शिवसेनेची म्हणावी तशी राजकीय ताकद दिसत नाही. आक्रमक आणि विविध प्रश्नावर तुटून पडणा-या आणि मराठी बाणा कायम ठेवणा-या शिवसेनेची सोलापुरात काँग्रेस विरोधातील पक्ष म्हणून कायमच चांगली प्रतिमा राहिली आहे. आंदोलने आणि चळवळीतून हा पक्ष सोलापुरातही उभा राहिला. कार्यकर्तेही मिळत गेले. बाळासाहेब ठाकरे यांची जनमानसावर असलेला प्रभाव येथील शिवसैनिकांसाठी उपयोगी होता. मात्र १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेतल्या एकूणच शिस्तीला तडे जाऊ लागल्याने पक्ष म्हणून जी संघटन शक्ती जिल्ह्यात निर्माण व्हायला हवी होती, ती राहिली नाही. १९९५ मध्ये युतीला सत्तेसाठी त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर असलेल्या काही शिलेदारांनी अपक्ष म्हणून मोठी मदत केली. माढ्याचे बबनराव शिंदे, बार्शीचे दिलीप सोपल, करमाळ्याचे कै. दिगंबर बागल असे अनेक आमदार अपक्ष असले तरी युतीच्या सत्तेचे भागिदार झाले होते. त्या काळात शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र होते.

सोलापुरातून सलग तीन वेळा उत्तमप्रकाश खंदारे आमदार म्हणून निवडून येत होते. युतीच्या काळात ते मंत्रीही राहिले. ते एकमेव निष्ठावंत आमदार म्हणून दिसले. अन्य शिलेदारांनी नंतर हातात घड्याळ घेतले. पंढरपुरातून कै. वसंतराव काळेंनी शिवसेनेत प्रवेश केला, नंतर तेही काँग्रेसमध्ये दाखल झाले. दक्षिणचे माजी आमदार रतिकांत पाटील शिवसेनेत असलेतरी त्यांचा मुलगा मात्र राष्ट्रवादीचा पंचायत समिती सदस्य आहे. करमाळा आणि बार्शी तालुका तर शिवसेनेला सतत नेतृत्व बदलावे लागले. कधी हे तर कधी ते अशी स्थिती आजही आहेच. सोपलांना आव्हान देत राजा राऊत भगवा हातात घेऊन विधानसभेत पोहोचले, पण नंतर त्यांनीही काँग्रेसचा हात पकडला. नंतर पुन्हा राजा राऊतांनी सेनेत जाणेच पसंत केले. करमाळ्यात जयवंतराव जगतापांनीही धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकवेळी बाहेरून आलेल्या उमेदवाराला घेऊन विधानसभा लढविणा-या शिवसेनेला यावेळी नारायण पाटील मिळाले. मोहोळचे दीपक गायकवाडही आले आणि गेले. आता धवलसिंह मोहिते-पाटील शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत.

सोलापूर शहरही अपवाद ठरले नाही. काँग्रेसचे माजी महापौर विठ्ठल जाधवांना शिवसेनेने आश्रय दिला, पण नंतरही तेही सोडून गेले. आता दुसरे माजी महापौर महेश कोठे शिवसेनावासी झाले आहेत. अगोदर त्यांनी शहरमध्य मध्ये आव्हान दिले, तेथे फसल्यानंतर आता विडी घरकुलमधून महापालिकेत जाणे पसंत केले. जे पूर्वी शिवसेनेत होते ते अनिल पल्ली, अजय दासरी असे काही नेते काँग्रेसचा किल्ला लढविताना दिसत होते, तर काँग्रेसमध्ये असलेले महेश कोठे, देवेंद्र कोठे आणि काही नगरसेवक शिवसेनेकडून दिसले. त्यामुळे गेल्या काही काळापासून शिवसेनेची राजकीय ताकद वाढायला हवी होती, ती वाढली नाही. निष्ठावंत नेत्यांची खूप मोठी कमतरता दिसते आहे. जे शिवसैनिक निष्ठावंत म्हणून काम करतात त्यांना आजही निष्ठावंत म्हणूनच कम करावे लागते. शिवसैनिक म्हणून पुढे नेता झाल्याचे चित्र फारसे दिसत नाही. जिल्ह्याचा बुरूज आजही अस्थिरच आहे.

हे नेते आले अन् गेलेही, काही पुन्हा आले
कै.वसंतराव काळे (पंढरपूर), चंद्रकांत नाना निंबाळकर (वैराग), जयवंतराव जगताप (करमाळा), शिवाजी सावंत (माढा), रेवणसिद्ध खेडगी (अक्कलकोट), शिवाजी कांबळे (बार्शी) , राजेंद्र राऊत (बार्शी), विश्वास बारबोले (बार्शी), दीपक गायकवाड (मोहोळ), अविनाश शिंदे (मंगळवेढा), शिवाजीराव पिसे, शिवशरण पाटील-बिराजदार, अजय दासरी, अनिल पल्ली, प्रकाश कोडम, शैला स्वामी (सोलापूर).