आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी शिवसेना, संघटना आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सन 2012-13 या वर्षातील उसाचा दुसरा हप्ता अद्याप मिळाला नाही. जिल्ह्यातील 30 साखर कारखाने असून या कारखानदाराकडे दुसर्‍या हप्त्यापोटी 2 हजार कोटी रुपये थकले आहेत, ही रक्कम तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनामध्ये सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वानकर, माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, गणेश वानकर, प्रताप चव्हाण, अस्मिता गायकवाड, शाहू शिंदे, शिवाजी नीळ, गंगाराम चौगुले आदी सेना कार्यकर्ते सहभागी होते. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनामध्ये शेतकर्‍यांनी कारखान्यास मागील वर्षी ऊस घातला आहे. याचा दुसरा हप्ता अद्याप शेतकर्‍यांना दिला नाही. केंद्र शासनाने राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रति टन 330 रुपयांप्रमाणे 6 हजार 600 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मात्र अद्याप ही रक्कम शेतकर्‍यांना मिळाली नाही. यामुळे ही मदत गेली कुठे, असा सवालही केला आहे. सध्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट आहे, दुसरा हप्ता न दिल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दुसरा हप्ता तातडीने देण्याची यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली.

शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, या पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र अनेक पिके वाया जाण्याची शक्यता आहे. या शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाकडून मदतीची गरज असल्याने शेतकर्‍यांच्या विविध मागण्या मान्य करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील घाटणेकर यांनी निवेदनाद्वारे केली. या निवेदनामध्ये जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेल्याने दुष्काळ जाहीर करावा, खरीप हंगामासाठी पीक विम्याची मुदत वाढवून मिळावी, उजनी धरणाच्या डावा, उजवा व भीमा-सीना जोड कालव्यातून तत्काळ पाणी सोडावे, जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून सन 2013-14 मधील केंद्र शासनाच्या पॅकेजचे ऊस उत्पादकांना वाटप करावे, ठिबक सिंचनाचे नवीन प्रस्ताव स्वीकारण्यात यावेत, कृषी संजीवनी योजना रद्द करून शेतकर्‍यांच्या शेतीपंपाचे वीज बील माफ करावे, जिल्हा बॅक, राष्ट्रीयीकृत बँकांककडून पीककर्जाचे तात्काळ वाटप करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

या वेळी नामदेव भोसले, दत्तात्रय अंबुरे, बापू लोकरे, परमेश्वर आतकरे, किसन घोडके, नवनाथ उबाळे, अजिनाथ परबत, कालिदास काशिद, राजेंद्र कौलगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. खरिप हंगाम वाया गेल्यामुळे आता शेतकर्‍यांची भिस्त केवळ रब्बी पिकांवर आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून तातडीने मदतीची मागणी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.