आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivaji Maharaja Birth Anniversary Issue At Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जातपात न पाहता कारभार, गुणांची कदर करणार्‍या राजाचे स्मरण- छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आजही शिवाजी महाराजांची राज्यकारभाराची पद्धत मार्गदर्शक ठरत आहे. म्हणूनच त्यांनी काढलेले आज्ञापत्र म्हणजे राज्यकारभार कसा करावा याचा दिशादर्शक दस्ताऐवज आहे. सर्वसामान्य जनता डोळय़ासमोर ठेवून निर्णय घेणारा, शेतीच्या सुधारणेसाठी बळ देणारा, ब्रिटिशांचा धोका ओळखणारा असा बहुगुणी जाणता राजा म्हणून आपण शिवाजी महाराजांकडे पाहतो ते त्यांच्या या कर्तृत्वामुळेच.


रयतेच्या देठालाही हात लावू नका
शिवाजी महाराजांनी हे राज्य कधीच भोसल्याचे, मराठय़ांचे असे म्हटले नाही. तर हे रयतेचे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा अशी त्यांची भूमिका होती. म्हणून रयतेच्या देठासही हात लावू नका, अशा सैन्याला त्यांच्या सक्त सूचना होत्या. गलबते तयार करण्यासाठी जे लाकूड वापराल त्या शेतकर्‍याला त्या लाकडाची नुकसान भरपाई द्या असेही आदेश त्यांनी दिले होते. राष्ट्र एकाएकी उभं रहात नाही. त्यासाठी आधी तसा खंबीर समाज उभा करावा लागतो या भावनेतून त्यांनी सुरुवातीला समाजाच्या भल्याचे निर्णय घेतले.

सार्वमताला महत्त्व
कोणत्याही मोहिमेला निघण्यापूर्वी आपल्या सर्व सरदारांशी चर्चा करून निर्णय घेण्याची महाराजांची पद्धत होती. त्यामुळे मला वाटतं म्हणून नव्हे तर परिस्थिती काय आहे, याचा विचार करून प्रत्येकाच्या विचाराचा आदर करून निर्णय घेण्याचा प्रघात शिवाजी महाराजांनी पाडला. प्रत्येक मोहिमेवेळी ज्यांना गरजेचं आहे त्यांना विश्वासात घेतलं म्हणूनच त्यांचे अनेक मनसुबे पूर्ण झाले. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

सूक्ष्म नियोजन
आपल्या अनेक र्मयादा ओळखून शिवाजी महाराजांनी सपाट मैदानी प्रदेशातील लढाया टाळल्या. सहय़ाद्रीच्या भौगोलिक रचनेचे महत्त्व ओळखून त्यांनी आपले गनिमी कावा हे युद्धतंत्र विकसित केले आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा शत्रूला धूळ चारली. पण जेव्हा थेट अफजलखानला भेटण्याचा निर्णय झाला, तेव्हा योग्य आणि सूक्ष्म नियोजन करून तीही मोहीम फत्ते केली.

निधर्मी बाणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे सर्वात महत्त्वाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कारभार करताना कधीही जातीपातीचा विचार केला नाही. शिवाजी महाराज निधर्मी होते, याचे अनेक पुरावे घडोघडी आपल्याला सापडतील. मी मराठा जातीचा म्हणून माझे सर्व सरदार मराठे अशी त्यांची भूमिका नव्हती. त्या त्या पदावर माणूस बसवताना त्याची जात न पाहता त्याची योग्यता आणि कर्तृत्व याला महत्त्व दिले. म्हणूनच अठरा पगड जातीतील मावळय़ांनी अनेकवेळा शिवाजी महाराजांवरून आपला जीव ओवाळून टाकला. अन्य राजवटींमध्ये जात, धर्म, पंथ, नातलग यांना महत्त्व देण्याची स्पर्धा असताना शिवाजी महाराजांनी हे पथ्य पाळले. ही फार मोठी जमेची बाजू आहे.
शब्दांकन - समीर देशपांडे.