आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना वर्धापनदिन : सोलापूरमधून 4 आमदार निवडून आणण्याचा निर्धार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - 2004 मध्ये शिवसेनेने जिल्ह्यात चार आमदार निवडून आणले होते. सध्या जिल्ह्यातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी कोणालाच नाही. बुधवारी शिवसेनेचा 47 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त सोलापुरातील पदाधिकार्‍यांनी येत्या निवडणुकीत जिल्ह्यातून पुन्हा चार आमदार विधानसभेत पाठवण्याचा संकल्प केलाय. आगामी निवडणुकीचा कालावधी पाहता शिवसेनेची रणनीती अजून तशी दिसत नाही.
शिवसेनेचा जिल्ह्यातील पहिला आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्वाची संधी उत्तमप्रकाश खंदारे यांना मिळाली. त्यानंतर 2004 मध्ये शिवसेनेचे लाट आली आणि जिल्ह्यात चार आमदार निवडून आले. त्यावेळी संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर आणि जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे होते. चार आमदार निवडून आले, परंतु संघटनात्मक पातळीवर जिल्ह्यात फारसा फरक पडला नाही. निवडून आलेली काही नेतेमंडळी मूळच्या अथवा इतर पक्षसंघटनांकडे वळल्यानंतर सेना पुन्हा जणू त्या-त्या तालुक्यात पोरकीच झाली. शिवसेनेने ग्रामीण भागात नसले तरी महापालिकेत कसेबसे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेने नेरुरकर यांना संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. नेरुरकर पुन्हा आपल्या कौशल्याने संघटनात्मक कार्य करून चमत्कार घडवतील, अशी आशा शिवसेना पदाधिकार्‍यांना वाटत आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये शिवसेनेने पाण्याच्या टाक्या वाटप तसेच चार्‍या छावण्यांना मदत केली. परंतु सत्ताधारी वर्गाविरुद्ध असंतोष निर्माण करता आलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच भगवा फडकवू, असे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी सांगितले.

बरडे यांना विश्वास
आर्थिक बाबतीत कमी पडल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. मात्र, यंदा कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेरुरकर यांच्या नियोजनबद्धतेवर जिल्ह्यातून पुन्हा चार आमदार शंभर टक्के निवडून येतील, असा विश्वास सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केला आहे.