आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील निष्ठावान, जुन्या शिवसैनिकांना योग्य न्याय देणार - सुधीर पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शिवसेनेच्या उस्मानाबाद जिल्हाप्रमुखपदी विद्यमान उपजिल्हाप्रमुख तथा आदर्श शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सुधीर पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर सुधीर पाटील यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जुन्या व निष्ठावान शिवसैनिकांना न्याय व सन्मान देण्यासाठी तसेच शिवसेनेचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी काम करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून उस्मानाबादच्या जिल्हाप्रमुखपदी सुधीर पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नूतन जिल्हाप्रमुख पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात शिवसेनेच्या आगामी वाटचालीसंदर्भात माहिती दिली. यामध्ये त्यांनी प्रथम मागील कार्यकाळात समाजहितासाठी केलेल्या कार्याला माध्यमाने वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. त्याचेच फलित म्हणून जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या आगामी वाटचालीबाबत बोलताना सुधीर पाटील यांनी गेल्या काही वर्षांत शिवसेनेचे संघटना म्हणून कार्य कमी झाल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक गावातील शिवसेनेच्या शाखेचे पुनर्जीवन करणार, प्रत्येक गावाला शाखा सुरू करून गावाच्या प्रवेशद्वारावर बोर्ड व त्यावर पदाधिका-यांची नावे ही शिवसेनेची जुनी पद्धत कार्यरत करणार असल्याचे सांगितले.
प्रत्येक महिन्याला तालुका, विभागीय पातळीवर बैठका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यकारिणीत बदल होणार का? याबाबत विचारले असता, कार्यकारिणीत कोणतेच बदल करण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट करून विद्यमान पदाधिका-यांना सोबत घेऊन शिवसेना संघटन बांधणीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. येत्या दोन महिन्यात गाव तेथे शिवसेनेची शाखा व प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप युतीबरोबर एकत्रित पॅनल उभे करण्यात येइल, असे सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेता दत्ता साळुंके, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शामल वडणे यांची उपस्थिती होती.

आमदारांवर नाराजी!
जिल्ह्यात शिवसेनेंतर्गत गटबाजी असल्याचे विचारल्यानंतर याचे पाटील यांनी खंडण केले. त्याचबरोबर उस्मानाबादच्या आमदारांच्या कार्याबाबत बोलताना त्यांच्यावर शिवसैनिक नाराज असल्याचे सांगितले. तसेच विधानसभेसाठी आजही इच्छुक असून पुढेही राहणार असल्याचे स्पष्ट केले. जरी शिवसेना कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदारांना तिकिटाबाबत पाठबळ दिलेले असले तरी लोकसभेतही असा शब्द दिलेला असताना प्रत्यक्ष कामगिरीचा आढावा घेताना तिघांना वगळण्यात आले. तसेच विधानसभेला होऊ शकते असेही पाटील यांनी सांगितले.

फोटो - शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर सुधीर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.