आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉपिंग गाळ्यांसाठी आता मार्कंडेय उद्यानावर डोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील बागांच्या जागांचे आरक्षण उडवण्याचा सपाटा लावलेल्या महापालिकेत आता अस्तित्वात असलेल्या बागांचा गळा घोटणे सुरू झाले आहे. 25 मिलीमीटर पाऊस झाला तरी शहरात सर्वत्र पाणीच पाणी होऊ लागले आहे. अशा स्थितीत सर्वत्र सिमेंटचे जंगल उभारण्याचा मोह महापालिकेला सुटतच नाही. शुक्रवारी होणार्‍या स्थायीच्या सभेपुढे मार्कंडेय उद्यानाच्या जागेत शॉपिंग उभारण्याचा सभासद प्रस्ताव आला आहे.

शुक्रवारी, दि. 12 जुलै रोजी होणार्‍या स्थायी समितीच्या सभेचा अजेंडा प्रसिध्द झाला आहे. त्यामध्ये 125 क्रमांकाचा हा विषय आहे. र्शवंती मंडप अँण्ड इलेक्ट्रिक डेकोरेटर, (पत्ता-विडी घरकुल) ही व्यावसायिक संस्था आहे. या संस्थेस अशोक चौक येथील मार्कंडेय उद्यानातील 50 टक्के जागा बीओटी तत्त्वावर देण्याचा विषय आहे. उद्यानातील 50 टक्के भाग विकसनकर्त्यांस देऊन त्याचा व्यापारी तत्त्वावर विकास व देखभाल करणे व उर्वरित भाग विकसित करून देखभाल करणे या तत्त्वावर 29 वष्रे 11 महिने मुदतीकरता हा विषय आला आहे. यामुळे बागेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

मनपाने लावलाय बागा खासगीकरणाचा सपाटा
शहरातील 28 उद्यानांपैकी तीन उद्याने बीओटी तत्त्वावर दिलीत.
भवानी पेठेतील उद्यान पन्नास टक्के मंगल कार्यासाठी दिले.
सोशल हायस्कूलसमोरील केएमसी उद्यान मंगल कार्यासाठी दिले.
पूर्व भागातील बालाजी उद्यान अशाच पद्धतीने दिले गेले आहे.
नूतन आयुक्त म्हणाले, कायद्याच्या चौकटीत असेल तरच मंजुरी.
उद्यानाचे अस्तित्व संपण्याची भीती

बीओटीवर देणे नकोच
अशोक चौक भागातील एकमेव असे उद्यान आहे. अगोदरच विविध कारणांसाठी दीड ते पावणेदोन एकर जागा व्यापली गेली आहे. त्यामुळे उद्यानाची 50 टक्के जागा बीओटी तत्त्वावर देऊ नये. शक्य झाल्यास सुरक्षा भिंत म्हणून उद्यानाच्या दोन्ही बाजूने महापालिकेने मिनी गाळे बांधावेत.’’ पुरणचंद्र पुंजाल, माजी महापौर

जागा हडप करण्याचा डाव
महापालिकेला उत्पन्नाची काळजी असेल तर त्यांनी इतर ठिकाणी उत्पन्न वाढवून दाखवावे. जागा हडप करण्याचा डाव आखू नये. तसेच आमच्या भागातील नागरिकांसाठी एकमेव असे उद्यान आहे. या भागातील नागरिक लकी चौक आणि संभाजी तलाव येथील उद्यानात जाऊ शकणार नाहीत. पन्नास टक्के जागा न देता उद्यानाच्या चारही बाजूंनी गाळे बांधून उत्पन्न कमवावे.’’ मेघनाथ येमूल, नगरसेवक

..तरच मिळेल मंजुरी
स्थायी समितीमध्ये आलेल्या प्रस्तावाबाबत मला काहीच माहीत नाही. याबाबत मी चौकशी करतो. तसेच, कुठलाही विषय आणून त्यास मंजुरी मिळाली म्हणून त्याची अंमलबजावणी होतेच असे नाही. जे कायद्याच्या चौकटीत बसते त्यालाच मंजुरी दिली जाईल अन्यथा नाही.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त महापालिका

दीड एकराची होईल बाग
मार्कंडेय उद्यानाची जी जागा आहे ती सुमारे साडेचार ते पाच एकर आहे. यामध्ये एमएसईबी, सार्वजनिक शौचालय, वाचनालय, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पुतळा, नाला आदीसह सुमारे दीड ते पावणेदोन एकर जागा व्यापली गेली आहे. उर्वरित तीन ते पावणेतीन एकर जागेतील पन्नास टक्के जागा बीओटी तत्त्वावर देण्यात आली तर उद्यान आकसून जाईल. केवळ दीड एकराची बाग शिल्लक राहील. या भागातील एकमेव ऑक्सिजन देणारे केंद्र आहे. कामगारवर्गातील मुलांकरता एकच उद्यान आहे. उद्यानातील एवढी मोठी जागा जर व्यापली गेली तर उद्यानाचे अस्तित्वच संपू शकते.