आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्रामप्पा म्हणाले, ‘कन्नड येत नाही..!’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एरवी राजकीय आणि सार्वजनिक जीवनात कन्नड भाषेतून ‘अनेकांची फिरकी’ घेणार्‍या आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी आज न्यायालयासमोरच, ‘मला कन्नड येत नाही, मराठीत प्रश्न विचारा’ असे सांगितले. त्यामुळे त्यांची साक्ष घेणार्‍या कन्नड भाषिक वकिलांना प्रश्नोत्तरासाठी कन्नड-मराठी दूभाषकाची भूमिका बजावावी लागली.

शेगाव खून-खटला प्रकरणात आमदार पाटील हे प्रत्यक्षदर्शी जखमी साक्षीदार आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर बुधवारी त्यांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात आली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील धैर्यशील पाटील यांनी आमदार पाटील यांचा सरतपास घेतला. यावेळी पाटील यांनी 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शेगाव येथे भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो असे सांगितले. गावातील लायव्वा देवीचे दर्शन घेऊन मी मंदिरासमोरील सभागृहात आलो. तेथे बाबूराव बसप्पा पाटील, प्रकाश बसप्पा पाटील, अण्णाराव उर्फ पिंटू बाबूराव पाटील, उस्मान महिबूब शेख, शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे, संतोष षडाक्षरी अरवत यांच्यासह 25 ते 30 जण हातात हंटर, लोखंडी टोकदार सळई, काठय़ा, तलवारी घेऊन आले. त्यांनी, ‘आमच्या गावात का आलात? तुम्ही म्हेत्रे साहेबांचा विरोध करता काय? आमच्या गावातून निघून जा’, असे म्हणत ‘म्हेत्रे साहेब की जय’ अशा घोषणा दिली आणि आम्हाला मारहाण केली. यावेळी बाबूराव पाटील यांनी हातातील लोखंडी टोकदार सळई भीमण्णा कोरे यांच्या उजव्या कानाजवळ खूपसली. गुरुनाथ पाटील याने हंटरने कोरे यांच्या डोक्यात वार केला तर मल्लिकार्जून पाटील याने हंटरने कोरे यांच्या पाठीवर मारहाण केल्याचे सांगितले.

यावेळी संगप्पा गड्डी याला पिंटू पाटील याने तलवारीने पोटात मारले. शिवमूर्ती विजापूरे, कल्लप्पा गड्डी, लायप्पा गड्डी, गफूर पटेल, महादेव कोरे, र्शीमंत कोरे, सुरेश झळकी यांना तलवार, काठीने आणि हंटरने मारहाण करण्यात आली. शंकर म्हेत्रे यांनी चाकूने डाव्या दंडावर वार केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. या मारहणीत कोरे यांचा मृत्यू झाला, तर इतर कार्यकर्ते जखमी झाले. या काळात सिद्धाराम म्हेत्रे मंत्री असल्याने त्यांच्या दबावाखाली पोलिस व्यवस्थित तपास करत नव्हते, असा दावाही पाटील यांनी केला. फिर्यादीचा जबाब आम्हाला वाचून दाखवला नाही. आरोपींना अटक होत नव्हती, जखमीचे जाबजबाब घेतले जात नव्हते, म्हणून 27 सप्टेंबर 2009 रोजी अक्कलकोट येथे पोलिसांविरुद्ध भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढल्याचेही आमदार पाटील यांनी आवर्जून सांगितले. त्यानंतर पोलिसांनी 28 सप्टेंबर रोजी जबाब घेतला, पण तो आम्हाला वाचून दाखवला नाही, असे स्पष्टीकरण आमदार पाटील यांनी दिले. घटनेवेळी घातलेला नेहरू शर्ट आमदार पाटील यांनी न्यायालयात ओळखला आणि आरोपीही ओळखला.

..म्हणून बाबूराव पाटील चिडून
आमदार पाटील कोर्टासमोर म्हणाले, 1992 मध्ये अक्कलकोट पंचायत समिती येथे आणि 1999 मध्ये मुंबईतील व्ही. टी. स्टेशनवर माझ्यावर गोळीबार झाला होता. याप्रकरणात बाबूराव पाटील आणि त्याचे नातेवाईक आरोपी होते. बाबूराव पाटील यांची भावजय (आण्णाराव यांची पत्नी) या तडवळ गणातून माझ्या पत्नीविरुद्ध पराभूत झाल्या होत्या. तेव्हापासून बाबूराव पाटील माझ्यावर चिडून होता.

उलट तपासणी : आरोपीच्या वकिलांनी आमदार पाटील यांचे शालेय शिक्षण कन्नड माध्यमातून झाले आहे. यासंदर्भात पुरावा म्हणून शाळेच्या दाखल्याची प्रत न्यायालयात सादर केली. तसेच शेगाव ते आमदार पाटील यांचे गाव कुमठा यातील आठ ते दहा किलोमीटरचे अंतर आणि शेगाव ते म्हेत्रे यांचे गाव दुधनी हे 70 ते 80 किलोमीटरचे अंतर याची स्पष्टता केली. इतक्या लांबून येऊन कोणी दमदाटी किंवा मारहाण करेल काय? असा उद्देश आरोपींच्या वकिलांचा प्रश्न विचारण्यामागे होता.

आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
आरोपीच्या वकिलांनी कन्नड आणि मराठीतून जवळपास 100 प्रश्नांच्या फैरी झाडल्या. त्यात बरेच प्रश्न असे होते की, त्याचे नेमके उत्तर त्यांना मिळत नव्हते. तेव्हा विचारण्यात आलेल्या प्रतिप्रश्नाने न्यायालयात हशा पिकत होता. यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील धैर्यशील पाटील, मूळ फिर्यादीतर्फे अँड. मिलिंद थोबडे, अँड. राजकुमार म्हात्रे, आरोपीतर्फे अँड. व्ही. डी. फताटे, अँड. विक्रांत फताटे, अँड. हर्षद निंबाळकर, अँड. जी. जी. दोडमनी यांनी काम पाहिले.

आज पुन्हा उलटतपासणी : याप्रकरणी उद्या (गुरुवारी) पुन्हा आमदार पाटील व इतरांची उलटतपासणी होणार आहे.


म्हेत्रेंची चिथावणी
घटनेच्या आठ दिवसांपूर्वी सिध्दाराम म्ह़ेत्रे आणि शंकर म्हेत्रे यांनी शेगावमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तुम्हाला कोण काय बोलेले तर मला सांगा, पाच मिनिटांत मी माणसे पाठवून देतो, तुम्ही कोणालाही मारा, काहीही करा, अशी चिथावणी दिल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

खटल्याची पार्श्वभूमी
2009 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान 26 सप्टेंबर 2009 रोजी सिद्रामप्पा पाटील हे शेगाव येथे भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते. तेथे शंकर म्हेत्रे यांच्यासह 28 जणांनी सिद्रामप्पा पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांवर लोखंडी सळई, तलवारी, हंटर व काठय़ांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात भिमाशंकर ईश्वरप्पा कोरे यांचा मृत्यू झाला होता.