आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात होणार रेशीम पार्कची उभारणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मौजे दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील ६२ एकरवर रेशीम पार्क उभारण्यात येणार आहे. सहकार वस्त्रोद्योग खात्याने त्याला मंजुरी दिली. दोन कोटी ७५ लाख ९३ हजार रुपयांची तरतूदही केली. रेशीम कोश सूत विक्रीची एकाच ठिकाणी सोय होणार आहे. सुधारित तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रही येथे सुरू केले जाणार असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. डी. जाधव यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले रेशीम कोश सरकारच्या किमान आधारभूत किमतीनुसार सरकारी केंद्रांवर खरेदी करण्यात येतात. खुल्या बाजारपेठेत जादा दर मिळत असल्यास शेतकऱ्यांना तिथे विकण्यास मुभा आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश खासगी रिलिंग उद्योजकांकडे जात आहेत. वारंवार इतर राज्यांत जाऊन विक्री करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे राज्यातच खुली बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून रेशीम उद्योजकांची मागणी होती. त्याबाबत रेशीम संचालकांनी विचार करून सोलापूरला रेशीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव दिला. तो सरकारने मंजूर केला. येत्या तीन वर्षात त्याची उभारणी होईल, असेही श्री. जाधव म्हणाले.

गायकवाडयांनाच श्रेय
राज्याच्यामुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले रत्नाकर गायकवाड सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. त्या वेळी खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी बरेच प्रकल्प राबवले. मुळेगाव येथे बंजारा समाजातील वंचितांसाठी औद्योगिक वसाहत उभारली. त्याच वेळी ‘रेशीम पार्क’ची संकल्पना मांडली होती. त्याला तब्बल २० वर्षांनी यश मिळाले आहे. रेशीम पार्कच्या या प्रकल्पाचे सारे श्रेय श्री. गायकवाड यांनाच जाते.
हातमागावर रेशीम साड्यांचे उत्पादन घेणारे व्यापारी मंडळी कर्नाटकातून रेशीम आणतात. उत्पादक िवकतो त्यापेक्षा अधिक दराने त्यांची खरेदी असते. स्थानिक बाजारपेठेतून मात्र त्यांना कमी दरात सूत उपलब्ध होईल.

बहुतांश उत्पादक कर्नाटक प्रांतातील म्हैसूरच्या रामनगरम येथे कोश विक्रीसाठी जायचे. तेथे किलोमागे ५०० रुपये दर मिळतो. परंतु वाहतूक खर्च तितकाच आहे. अशाच पद्धतीचा दर सोलापूरच्या पार्कवर देणे भविष्यात शक्य आहे.

पार्कचे फायदे
१.रेशीम कोश आणि सूत िवक्रीसाठी परराज्यात जायचे नाही
२. शेतकऱ्यांना पर्यायी उत्पादन म्हणून रेशीम उत्पादन वाढेल
३. सुशिक्षित बेरोजगार युवक या उद्योगाकडे आकृष्ट होतील
४. रेशीम साड्या उत्पादकांना मुबलक प्रमाणात सूत िमळेल

पार्कमध्ये असेल
१.रेशीम कोश सूत विक्री करण्याची सुविधा एकाच ठिकाणी
२. तुती लागवड करणाऱ्यांना सुधारित वाणांच्या रोपांचा पुरवठा
३. केंद्रीय रेशीम मंडळाचे सुधारित तंत्रज्ञान अन् त्याचे प्रशिक्षण
४. तुती आणि टसर उद्योगवाढीसाठी वृक्षांची लागवड करणार

उद्योग, रोजगार वाढेल
- शेतीव्यवसायात काही नाही म्हणून हताश झालेल्या शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनाकडे वळवण्याचे प्रयत्न आहेत. पार्क उभारल्यानंतर परिसरातील तालुक्यांत शेतकऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देऊ. त्यांच्याकडील उत्पादित कोश आणि सुताला चांगला दर देण्याचे प्रयत्न राहतील. रेशीम साडी उत्पादक भेटले तर त्यांनाही चांगल्या प्रतीचा सूत उपलब्ध करून देऊ.” एस.डी. जाधव, जिल्हारेशीम अधिकारी, सोलापूर