आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमीचे दोन संशयित सोलापूरमध्ये जेरबंद, एमपी, औरंगाबाद एटीएसची साडेपाच तास संयुक्त कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मध्य प्रदेशच्या खांडवा जेलमधून ऑक्टोबरमध्ये पळालेला सिमीचा अतिरेकी डॉ. अबू फैसल व त्याच्या सहा साथीदारांना मदत केल्याच्या संशयावरून मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेश व औरंगाबाद येथील एटीएसने ही कारवाई केली.
मोहंमद सादिक अब्दुल वहाब लुंझे, ओमर अब्दुल हाफिज दंडोती अशी त्यांची नावे आहेत. कुंभारी येथील गोदुताई विडी घरकुल परिसरात तीन ठिकाणी छापे टाकून पकडण्यात आलेल्या अन्य तिघांना चौकशीनंतर सोडले.
घरातून थेट गाडीत बसवले : पाच्छा पेठेत दुपारी 2.24 वाजता एटीएसच्या कमांडोंनी सादिक यास घरातून बाहेर काढत गाडीत बसवले. संगणक, प्रिंटर आदी साहित्य जप्त केले. 4.30 वाजता कर्णिकनगर येथे पोलिसांनी दंडोती यास पकडले. त्याच्याकडून डिटोनेटर, जिलेटिन, पिस्तूल, 7 काडतुसे जप्त केली. सादिक, त्याचा भाऊ घरीच प्रिंटिंगचा व्यवसाय करतात. साडेपाच तास चाललेल्या कारवाईत मध्य प्रदेश व महाराष्ट्राचे प्रत्येकी 10 अधिकारी व सोलापूरचे 25 पोलिस होते. औरंगाबादचे एटीएसप्रमुख नवीनचंद्र रेड्डी, सोलापूरचे उपायुक्त खुशालचंद बाहेती आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.
... अन् पोलिस शेताकडे पळाले
गोदूताई विडी घरकुल येथील तिसर्‍या ठिकाणी जेव्हा पोलिस पथके पोहोचले. तेव्हा एका घराला पथकाने घेरले. सर्वांच्या हातात गन होते. यातीलच काही पोलिस बाजूच्या शेताकडे पळत सुटले. त्यांच्या मागे पोलिसांचे एक वाहनही गेले. शंभर फुटाच्या अंतरापर्यंत पोलिस कोणालाच येऊ देत नव्हते. याबाबत विचारले असता पोलिस पथकाने गुप्तता पाळली.
प्रकरण काय
मध्य प्रदेशच्या खांडवा तुरुंगातून 1 ऑक्टोबर 2013 रोजी सहा दहशतवादी पसार झाले होते. मुंबईचा अबू फैसल मुख्य सूत्रधार होता. फरार झालेल्यांत फैसलसह अमजद रमजान, असलम अय्युब, जाकीर बदरुल हुसेन, एजाजुद्दीन अजिजुद्दीन व महेबूब ऊर्फ गुड्डू यांचा समावेश आहे. फैसलसह अन्य दोघांना मंगळवारी एटीएसने अटक केली.