आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएसने लुंजे, दंडोती यांना इंदूरला हलवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सिमी कार्यकर्ता डॉ. अबू फैझल व त्याच्या सहकार्‍यांना मदत केल्याप्रकरणी सोलापुरातील महमद सादिक अब्दुल वहाब लुंजे, ओमर अब्दुल हाफीज दंडोती या दोघांना मंगळवारी रात्री अटक झाली. बुधवारी पहाटे तीनच्या सुमाराला दोघांना एसटीएस पथकाने इंदूरला नेले. त्यानंतर न्यायालयात त्यांना हजर केले आहे.
सोलापूर पोलिसांच्या मदतीने इंदूर, औरंगाबाद, पुणे विभाग एटीएस पथकाने दोघांना अटक केली. खलीद मुछाले हा इंदूरच्या कारागृहात शिक्षा भोगत होता. त्यावेळी सिमी कार्यकर्ता अबू फैझल याच्याशी ओळख झाली.
जानेवारी महिन्यात मुछाले पॅरोल जामिनावर बाहेर आला, तर फैझल व त्याचे साथीदार ऑक्टोबर महिन्यात कारागृहातून पळाले होते. त्यानंतर मुछालेने सोलापुरातील लुंजे व दंडोती या दोघांना हाताशी धरून त्यांना आयडी मिळवून देण्यात मदत केली. दंडोतीकडे स्फोटके ठेवली. मागील आठवड्यात मुछाले हा इंदूर एटीएस पथकाच्या जाळ्यात सापडल्यानंतर तपासात ही माहिती दिल्यानंतर एटीएस पथकाने काल ही कारवाई केली.
सतर्कता, गोपनीय माहितीची शहानिशा
सोलापूर पोलिसांनी सतर्कता बाळगून संवेदनशील भागात लक्ष ठेवले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवून आहेत. अहवाल तयार केला आहे. औरंगाबाद एटीएसचे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी व त्यांचे पथक बुधवारी सोलापुरातच होते. गुन्हे शाखेचे साहाय्यक आयुक्त खुशालचंद बाहेती, निरीक्षक संदीप गुरमे व त्यांचे पथक घडामोडींचा आढावा घेत होते.
यंत्रणा सक्रिय आहे
संवेदनशील भागात बंदोबस्त, कोम्बिंग ऑपरेशन ही प्रक्रिया आपण सातत्याने व नियमित करतोय. प्रत्येक घटनांवर आमचे पोलिस लक्ष ठेवतात. नागरिकांनीही दक्ष राहून आजूबाजूला कोण काय करतोय, संशयित कुणी फिरतोय का याची माहिती पोलिसांना द्यावी. आपणी दक्ष राहून काम केल्यास या घटनांना आळा बसेल, असे पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
उलगडा होणार
इंदूर एटीएस पथकाकडून घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेची माहिती संकलित करण्यात येत आहे. या पथकाकडून संपूर्ण घटनेचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.