आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंडोती आणि लुंजे कुटुंबीयांची न्यायालयीन लढय़ाची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे दोन युवकांना अटक केली. त्यांच्यावर लावलेले आरोप खोटे असून एटीएसने बेकायदेशीरपणे त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची सुटका आणि न्यायासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याची माहिती दंडोती आणि लुंझे कुटुंबीयांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली. याबाबतचे निवेदन दोन्ही कुटुंबीय आणि काही संघटनांनी दिल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी दिली.

पोलिस घरी आलेच नाहीत, तरीही स्फोटके सापडली?
24 डिसेंबर रोजी रात्री कर्णिक नगर येथे बंगल्यात दंडोती कुटुंबीय जेवताना ओमरला मोबाइलवर कॉल आला. तो मोबाइलवर बोलत घराबाहेर आला. त्याला दोन पोलिस दुचाकीवर घेऊन जाताना त्याचा लहान भाऊ उसेदने पाहिले. त्याने ही माहिती आई-वडिलांना सांगितली. कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले आणि ओमरविषयी चौकशी केली. त्यावेळी पोलिसांनी तुमच्या मुलाला चौकशीसाठी बोलावले आहे, चौकशी पूर्ण होताच सोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. रात्री उशिरा दीड वाजता पोलिस घरात आले आणि ओमरच्या अटकेची माहिती देत एका कागदावर ओमरच्या आईची सही घेतली. 25 तारखेस सकाळी वृत्तपत्र पाहिल्यानंतर गंभीर परिस्थिती समजली. आमच्या घरातून पिस्तुल, काडतूस, डिटोनेटर आदी स्फोटक साहित्य मिळाल्याच्या बातम्या वाचल्या. तेव्हा आम्हाला धक्काच बसला. पथक किंवा पोलिस आमच्या बंगल्यात आलेच नाही. मुलाला बाहेरच्या बाहेर घेऊन गेले. मग आमच्या घरातून स्फोटके कशी मिळाली? मुलाला एटीएस गोवत आहे असे अ.हाफीज दंडोती यांनी सांगितले.

निवेदन वरिष्ठांना पाठवू
दंडोती व लुंजे कुटुंबीयांनी निवेदन दिले आणि त्याद्वारे त्यांच्या मुलांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचे सांगितले. काही संघटनांनी निवेदन दिले आहे. ते वरिष्ठांना पाठवणार आहे. ज्यांच्यावर नजर ठेवायची आहे त्यांच्यावर ठेवण्यात आली आहे. पोलिस पूर्वीपासून सतर्क आहेतच, पुढेही सतर्क राहणारच.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त

लुंजे कुटुंबीयांचे स्पष्टीकरण
माझा मुलगा म. सादिक आणि मी दुपारी नमाजसाठी गेलो आणि येताना तो अगोदर घरी आला. रस्त्यातच त्याला पिस्तुल लावून घरात घेऊन गेले. नंतर मी आलो तर मला घरात प्रवेश नाकारला. घरात माझा मुलगा, सून आणि लहान नातवंडे होती. एटीएस पथकाने माझ्या सुनेला आणि मुलाला पिस्तुल कुठे लपवून ठेवले आहे सांगा, अशी वारंवार विचारणा केली. यानंतर घरातील सर्व साहित्यांची उलथापालथ केली. नातवाला दूध पाजायलाही दिले नाही. दोन तासानंतर संगणक, हार्ड डिस्क, कागद, पुस्तके, अल्बम आदी घरातील सर्व साहित्यांसह माझ्या मुलाला घेऊन गेले. आम्ही जेलरोडमध्ये गेलो. एटीएस कारवाईविषयी आम्हाला काही माहिती नाही, असे सांगण्यात आले. रात्री दीडच्या सुमारास काही पोलिस आले आणि त्यांनी मुलाला स्फोटक पदार्थ अधिनियम अंतर्गत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. एका कागदावर माझ्या सुनेची सही घेतली. आमच्या घरात काही स्फोटक साहित्य मिळालेच नसतानाही विस्फोटक पदार्थ अधिनियमाची कलमे लावली. पंचनामा करण्यात आला नाही. घरातील साहित्य घेऊन गेले. त्याचे चित्रीकरण केले नाही. ही कुठली पद्धत आहे कळत नाही. आमची फॅमिली उच्च् शिक्षित असून एकही तक्रार कुठे नाही. माझ्या मुलाला विनाकारण गोवण्यात आले आहे. त्याच्या सुटकेसाठी केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती अ. वहाब लुंजे यांनी दिली.