आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - वाढत्या उन्हासोबत सीना नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्नही तापत आहे. उजनी धरणातून 3 एप्रिलला सोडलेल्या पाण्याने दोन दिवसांपूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यात प्रवेश केला. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यात पाणी पोहोचण्यास वेळ लागत असल्याने शेतकरी संतापले आहेत. माढा आणि मोहोळ तालुक्याचा काठ पाण्याने भरला असला तरी वीज नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
उन्हाळ्यात पिकांना जादा पाणी लागते. माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटचा बहुतांश भाग भीमा आणि सीना नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सीनेत पाणी सोडण्यात आले. बाष्पीभवन आणि माढा, मोहोळ भागातील अमर्याद पाणी उपशामुळे खालच्या भागात पाणी पोहोचण्यास उशीर लागत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात पाण्याचा ठणठणाट आहे. शेतकर्यांमध्ये यामुळे उघडपणे नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे माढा, मोहोळ भागात दिवसात दोन तास वीज उपलब्ध असल्याने शेतकरी नाराज आहेत.
पाण्याची वाटचाल
उजनीतून सोडलेल्या पाण्याने बुधवारी शिंगोली (ता. उत्तर सोलापूर) बंधारा ओलांडला होता. पुढे ते अकोले, नंदूरमार्गे वडकबाळ येथे पोहोचेल. त्यानंतर सिंदखेड, बंदलगीमार्गे कोर्सेगावमध्ये पोहोचणार आहे. यासाठी किमान 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागेल.
दोन दिवसांत पाणी पोहोचेल : माने
आमदार दिलीप माने यांनी बुधवारी सकाळी पाकणी, शिंगोली परिसरात पाण्याची पाहणी केली. ते ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले, पाण्याचा वेग वाढला आहे. दोन दिवसांत वडकबाळ बंधार्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर पुढे पोहोचण्यास जादा वेळ लागणार नाही.
दक्षिण सोलापूर, अक्कलकोटवर अन्याय
पाणीवाटपाच्या नियमानुसार प्रथम शेवटचा बंधारा भरून घेतला पाहिजे. सध्या वरच्या भागातील बंधारे भरून घेण्याचे काम सुरू आहे. हा दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेतकर्यांवर अन्यायच आहे. दीड महिन्यापासून वडकबाळ, सिंदखेड परिसरात पाणी नाही. वेळेत पाणी न पोहोचल्यास आंदोलन उभारणार आहोत.’’ विलास लोकरे, जिल्हा संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस
10 दिवसांत कोर्सेगाव बंधार्यापर्यंत
31 मार्चपर्यंत वडकबाळ आणि परिसरातील बंधार्यात पाणी होते. माढा, मोहोळ तालुक्यातील वीजपुरवठा बंद असल्याने पाणी वेगाने खाली येत आहे. 10 दिवसांत पाणी कोर्सेगाव बंधार्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.’’ अजय दाभाडे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र प्राधिकरण
डोळ्यासमोर पिके करपली
15 लाख रुपये खचरून आम्ही नदीवर पाइपालाइन टाकली. गेल्या वर्षी दुष्काळामुळे नुकसान झाले. आता माढा, मोहोळ भागात पाणी अडकून पडल्याने पोहोचण्यास उशीर लागत आहे. डोळय़ांसमोर पिके जळत आहेत. तातडीने पाणी पोहोचणे गरजेचे आहे.’’ पिरप्पा ब्याळे, शेतकरी, हत्तूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.