आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देगाव हल्लाप्रकरणी सहा जणांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- देगावनजीक ट्रॅक्टर व खासगी बसच्या धडकेवरून शुक्रवारी 25 जणांवर प्राणघातक हल्ला करून बस जाळली होती. या मारहाणीत सात जण जखमी झाले होते. सलगरवस्ती पोलिसांनी या प्रकरणी संशयित सहा आरोपींना अटक केली आहे. संशयित आरोपींमध्ये माजी नगरसेवक राजेंद्र कांबळे - कोळी यांचा समावेश आहे. ते जखमी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

रामटेक येथील जैन समाजाच्या कार्यक्रमासाठी साधक निघालेले असताना हल्ला होता. जखमी जैन साधकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये सोलापुरातील सुरेश बोरकर, शिवानंद कोरे, विठ्ठल सोतवे, विठ्ठल कस्तुरे, शिवराम कस्तुरे, ट्रॅक्टरचालक नागनाथ विठ्ठल कोले (रा. सर्वजण बसवेश्वरनगर, देगाव नाक्याजवळ, सोलापूर) यांचा समावेश आहे. माजी नगरसेवक राजेंद्र कांबळे - कोळी हे मुख्य संशयित असल्याची माहिती, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी दिली.

हल्ला करून बस जाळल्याची फिर्याद आदगोंडा रायगोंडा पाटील (वय 27, रा. म्हैसाळ, ता. मिरज) यांनी दिली आहे. संशयित आरोपींवर दरोडा, प्राणघातक हल्ला कलम 395, 307, 341, 342, 279, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. ट्रॅक्टरला (एमएच 43 जे 7428) खासगी बस (एमएच 09 सीए 3790) धडक बसली होती. यानंतर चिडलेल्या जमावाने सर्वांना बसमध्ये कोंडून तलवार, काठी, दगडाने मारहाण, शिवीगाळ केली व बस पेटवून दिली. बसचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. तरुणांजवळील काही मोबाइल व पन्नास हजार रुपये काढून घेतल्याचे आदगोंडा पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

बसचालकासह 8 जणांवर गुन्हा
कांबळे (कोळी) यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत खासगी बसचालकासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टर व बस या दोन चालकांमध्ये बाचाबाची सुरू होती. कांबळे भांडण सोडवताना बसमधील सात-आठजणांनी त्यांना मारहाण केली. कांबळे हे बेशुध्द व जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कुणाला अटक नाही.