आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाडीवाकदची घरं पाचोळ्यागत भिरभिरली; पिकांचा चिखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम-वाडीवाकद. रिसोड तालुक्यातील एक साधारण गाव. आज अक्षरश: उध्वस्त झालं आहे. वादळी पाऊस अन् गारांच्या तुफानी मार्‍याने 40 घरांवरील पत्रे आणि पारध्यांची 30 पालं पाचोळ्यासारखी उडाली अन् इथल्या अनेकांचे संसार उघड्यावर आले. एकूणच धोकादायक स्थिती लक्षात घेत रात्रीतून सर्व ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाने जवळच्या वाकद येथे स्थलांतरीत केले.
या गावची लोकसंख्या जेमतेम एक हजार. गावातील सर्व ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशूपालन. बहुतांश ग्रामस्थ शेती कामात व्यस्त होते. कुणी शेळ्या, मेंढय़ा चारत होते तर काही घरात निवांत बसलेले. दुपारी अडीचच्या सुमारास तुफान गारपीट सुरू झाली अन् काही क्षणात गावभर तीन फुटांपर्यंत बर्फाचा थर पसरला. वादळी वार्‍याने विजेचे तीन खांब उखडून काढले. परिसरातील एकाही झाडाला पान शिल्लक राहिले नाही. अवघ्या तीन तासांत होत्याचे नव्हते झाले. गारांच्या मारपीटीत 14 गावकरी गंभीर जखमी झाले, तर तब्बल 195 मेंढय़ासह शेकडो कोंबड्या, पोपट, चिमण्या आणि बगळ्यांचा मृत्यू चटका लावून गेला. इथली 17 घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली, विटांचा भुगा झाला. सुधाकर घुगे, अशोक घुगे, कैलास घुगे, तानाजी श्यामराव मुंढे यांनी सांगितलेला हा गारपीटीचा अनुभव.
माणुसकीही बरसली
वाडीवाकदच्या ग्रामस्थांवर एकिकडे आभाळ कोसळत असतानाच त्याचवेळी माणुसकी देखील बरसली. गारपीटीचा मारा झेलत रिसोडच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तत्काळ इथे पोहोचले; शिवाय वाकद, बाळखेड या गावातील ग्रामस्थ ऐनवेळी मदतीला धावले. त्यांनी सर्व आपद्ग्रस्तांना वाकदच्या जिल्हा परिषद शाळा आणि शिवाजी विद्यालयात हलवले इथल्या ग्रामस्थांपैकी कुणी खिचडी आणली तर कुणी चादर, सतरंजी!
काळजात खोल; सर्वत्र ओल
गावातील सर्वच घरांना ओल फुटलेली आहे. ज्यांच्या घराची पत्रे उडाली त्यांच्या घराचे अक्षरश: तळे झाले. डोळ्यांच्या पापण्यांसकट डाळी, पीठ, धान्य, पैसे, कपडे, अंथरुण, पांघरुण सर्व काही चिंब-चिंब थिजून गेले. इथल्या प्रत्येक माणसाच्या काळजात उरली ती फक्त खोलवर ओल!
उभ्या पिकांचा चिखल
गारपीटीने वाडीवाकदच्या घरांचे तर नुकसान झालेच. पण, काढणीला आलेल्या सबंध पिकाचासुद्धा चिखल झाला. गावातील एकूण 453 हेक्टर शेत जमिनीवरील गहू, हरभरा, भाजीपाला, फळबाग यांचे अतोनात नुकसान झाले आहे.