आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यपी सेवकाने घातला पालिकेत गोंधळ, कामकाज एक तासभर ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात येऊन आरोग्य विभागातील मद्यपी सेवक सिद्धप्पा रंगनाथ मोटे यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली. त्यामुळे तेथील कामकाज एक तास ठप्प झाले. हा प्रकार बुधवारी (दि. 12) दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

मोटे हे जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नेहमीच येतात. दाखल्यासाठी कागदपत्रे दाखल केल्यानंतर एका दिवसातच दाखल्याची मागणी करणे, अधिकार्‍यांशी वाद घालणे, उद्धट बोलणे, महिला कर्मचार्‍यांसमोर अश्लिल शिव्यांचा वापर करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचे जन्म-मृत्यू विभागातील कर्मचार्‍यांनी सांगितले. बुधवारीही मोटे यांनी अधिकार्‍यांशी वाद घातला आणि ‘तू तू मैं मैं’ झाली. या प्रकाराला कंटाळलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आयुक्त अजय सावरीकर यांचे कार्यालय गाठले. मात्र, आयुक्तांसह एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांनी आयुक्तांचे स्वीय साहाय्यक कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितल्यामुळे सर्व कर्मचारी कार्यालयाकडे परतले.

ही किटकिट रोजचीच आहे. याबाबत अधिकार्‍यांना सांगून थकलो. रोज येणे अर्वाच्य भाषा करणे, यामुळे आम्ही वैतागलो. आजही मोटे यांनी दमदाटी करत आमच्याशी वाद घातला. आयुक्त नव्हते मात्र कुलकर्णींना भेटलो. त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. आम्ही कसे तक्रार करणार?’’
एम. टी. पोळ, क्लार्क, जन्म-मृत्यू विभाग

सिद्धप्पा मोटे हा नेहमी येऊन कार्यालयात गोंधळ घालतो. कोणाला काय सांगायचे. याबाबत वरिष्ठ अधिकारी त्याची समजूत काढतील.’’
एम. एन. चंदनशिवे, उपनिबंधक, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग

छायाचित्र - अधिकारी आणि कर्मचारी फिर्याद घेऊन आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांकडे गेल्यानंतर जन्म-मृत्यू नोंदणी विभाग सुमारे एक तासभर ओसाड पडला होता. त्यामुळे नागरिकांना वाट पहात ताटकळत उभे रहावे लागले.