आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसिद्धीचा हव्यास अन् पैशासाठी स्वयंघोषित सर्पमित्रांची चलती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर ( 9765562862) - कोणताही मोबदला न घेता नागरिकांना मदत करणारे अनेक सर्पमित्र आहेत. सर्प वाचवण्याच्या मोहिमेत स्वत:ला झोकून देणार्‍या सर्पमित्रांना शासनाकडून ओळखपत्र देण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच, त्यांचा विमा उतरवण्याचे आश्वासन तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पाच वर्षांपूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय सर्पमित्रांच्या संमेलनात जाहीर केले. अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. सर्प वाचवण्यासाठी निष्काम सेवा करणार्‍या सर्पमित्रांचा गौरव करण्यासाठी तसेच, त्यांना पाठबळ देण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

सर्पमित्रांचे एकमेकांवर फुत्कार
शहर व जिल्ह्यांमध्ये अनेक सर्पमित्र संघटना कार्यरत आहेत. काही संघटना-कार्यकर्ते एकमेकांवर आरोप करतात. सर्पाचे विष काढणे, त्यांची विक्री करणे असेही आरोप एकमेकांवर होतात. त्यामुळे संघटनांमधील संघर्ष उफाळत असल्याने वनविभागाने ओळखपत्रांचे वाटप केले नाही.

कमिटीच्या परीक्षेत निम्मे गळाटले
ओळखपत्रांसाठी जिल्ह्यातून तब्बल 100 पेक्षा जास्त सर्पमित्रांनी प्रस्ताव दिले. पण सप्टेंबर 2009 मध्ये घेतलेल्या परीक्षेत एका खोलीमध्ये विषारी साप सोडून त्यांना सुरक्षित पकडण्याची परीक्षा घेतली. त्यावेळी ओळखपत्राच्या हव्यासापोटी आलेले निम्मे सर्पमित्र पळून गेले होते. त्यापैकी 25 जणांची निवड झाली. त्यांना स्वत:चा दोन लाखांचा विमा व इतर कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्यापैकी फक्त 13 जणांनी सादर केले होते.

गुप्तधनासाठी तस्करी
मांडुळापासून धनलाभ होतो, असा समज असल्याने काही लोक मांडुळ जवळ बाळगण्यासाठी धडपडताना दिसून येतात. वास्तविक पाहता मांडुळ हा मातीत राहणारा वन्यजीव प्राणी आहे. तसेच, मांडुळाचे प्रमुख अन्न उंदीर हे आहे. शेतामधील उंदरांना खाल्ल्यामुळे पिकांचे उंदरांपसून होणारे नुकसान टळते. त्या हेतूने शेतकर्‍यांना धनलाभ होतो. मात्र, त्याचा गैरअर्थ काढून मांडुळाची तस्करी करण्यात येते.

शेतकर्‍यांचा मित्र सर्प
उंदराच्या एका जोडीपासून वर्षभरात 770 उंदीर जन्मतात. या उंदरांचा नायनाट न केल्यास शेतातील पिके फस्त होतील. सर्प उंदरांना फस्त करत असल्याने शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टळते. त्यामुळे ‘शेतकर्‍यांचा मित्र’ अशी सर्पाची ओळख निर्माण झाली आहे.


सावधान! सर्प पकडण्याच्या नावाखाली दुकानदारी
शहर व ग्रामीण भागामध्ये काही भामट्या सर्पमित्रांनी पैसे कमवण्याच्या उद्देशाने सर्प पकडण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी काही चौकांमध्ये स्वत:चे सर्पाबरोबरच्या फोटोंचे डिजिटल तयार करून त्याद्वारे जाहिरातबाजी सुरू केलीय. सर्प आढळला तर संपर्क साधण्यासाठी त्यावर मोबाइल क्रमांक देण्यात येतो. सर्प पकडण्यासाठी मोबाइलवर संपर्क साधून कुणी बोलावले की हे भामटे घटनास्थळी जातात. सर्प पकडल्यानंतर एका हातातील पिशवीमध्ये सर्प अन् दुसर्‍या हाताने तो पकडल्याबद्दलचे पैसे मागतात.
तुमच्यासाठी माझ्या हातातील काम बाजूला ठेवून आलोय. तेही थोडेथोडके नाहीत तर त्यांनी ठरवलेल्या दराने पैशांसाठी हट्ट धरून बसतात. पैसे देण्यास कुणी नकार दिल्यास काही प्रसंगी तो सर्प तिथेच सोडून देण्याची धमकी देतात. त्यामुळे सर्प परवडला पण त्यास पकडण्यासाठी आलेला भामटा नको.. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे. त्याचा फटका सर्पांना वाचवण्यासाठी धडपडणार्‍या व कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवणार्‍या प्रामाणिक सर्पमित्रांना बसतोय.


स्वयंघोषित सर्पमित्रांकडून सर्पांचे होताहेत हाल
सोलापूर शहर व जिल्ह्यात एकत्रित सुमारे चारशेच्या आसपास सर्पमित्र आहेत. राज्यात ही संख्या दहा ते बारा हजारांच्या पुढे आहे. विषारी सर्प पकडून त्यांचे दात पाडून ते गळ्यात घालून फिरणे, अनेकदा हाताळून, फणा काढून डिवचणे, नागांचे प्रदर्शन करणे, असे प्रकार ते स्वयंघोषित सर्पमित्र करतात. सार्पांचे दात चुकीच्या पद्धतीने पाडल्याने त्यांच्या तोंडात जखमा होऊन त्यांचा मृत्यू होतो. तसेच, दात पाडलेल्या अवस्थेत त्यांना निसर्गात सोडल्यानंतर भक्ष्य पकडता येत नाही. परिणामी उपासमारीमुळे ते मरतात.


सर्पमित्र ढीगभर, तज्ज्ञांची मात्र आहे वाणवा
स्वत:ला सर्पमित्र म्हणून घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटात सर्पांच्या दुर्मिळ जाती, त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी संशोधनात्मक प्रयत्नांची गरज आहे. विषारी अन् बिनविषारी सर्पांची वर्गवारी, त्यांचा अधिवास वगळता सर्पांबद्दल फारसे संशोधन व अभ्यास अद्याप झाला नाही. देशपातळीवर आतापर्यंत झालेला अभ्यास केवळ निष्कर्ष व सूचनांपर्यंत र्मयादित राहिल्याचे चित्र आहे. सोलापूरसह अनेक विद्यापीठांमध्ये अद्याप सर्पांबद्दल कुणीही संशोधनात्मक अभ्यास केला नाही.


सर्पमित्रांच्या प्रोत्साहनासाठी नांदेड, सातारा पॅटर्नची गरज
नांदेड महापालिकेने वनविभागाच्या मदतीने तेथील प्रामाणिक सर्पमित्रांना एकत्रित करून त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. सर्प पकडण्यासाठी लागणारी स्टिक (काठी), प्राथमिक औषधोपचार व ओळखपत्र दिले. तसेच, सर्पमित्र व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्पमित्रांचा विमा उतरवण्याचे नियोजन केले आहे. सातारा वनविभागाने ओळखपत्रांसाठी अर्ज दिलेल्यांची परीक्षा घेऊन त्यांना ओळखपत्र दिली. त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील सर्पमित्रांसाठी उपक्रम राबवल्यास चांगले काम करणार्‍या सर्पमित्रांना प्रोत्साहन मिळेल.


विष तस्कारीचे रॅकेट
गेल्या आठवड्यात पुण्यात सर्पांच्या विषाची विक्री करणार्‍या दोघांना पकडून एक कोटी रुपयांचे विष जप्त करण्यात आले. गेल्या काही वर्षांत सर्पांच्या विषाच्या तस्कारीचे प्रमाण वाढले आहे. त्याचे धागेदोरे सोलापूरपर्यंत पोहोचले आहेत. अद्याप त्याचा छडा लावण्यात यश आले नाही. पाच वर्षांपूर्वी बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील देशमुख नावाच्या एका स्वयंघोषित सर्पमित्राकडून 15-20 विषारी सर्प जप्त केले. त्यातील काही साप प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवले असल्याने ते मृत झाल्याचे आढळले होते.


सर्पांना पकडणे, जवळ बाळगणे, त्यांची हत्या करणे याला कायद्याने मनाई
सर्पांचा समावेश वन्यजीव अनुसूची दोन व चारमध्ये आहे. सर्पांना पकडणे, जवळ बाळगणे, त्यांची हत्या करणे याला कायद्यानुसार मनाई आहे. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीने सर्पांचे संरक्षण- संवर्धन यांची गरज लक्षात घेऊन अपवादात्मक परिस्थितीत सर्प पकडल्यास त्यास वनविभागाची परवानगी घेऊन त्वरित निसर्गात मुक्त करणे बंधनकारक आहे. सर्पमित्र म्हणून जाहिरातबाजी किंवा डिजिटल लावण्यास परवानगी नाही. सर्प पकडल्यानंतर तो सोडण्यासाठी कुणी पैसे मागितल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा. किशोर ठाकरे, उपवनसंरक्षक, सोलापूर


सर्पमित्रांत वाढतोय गैरसमज
सर्प पकडता आला म्हणजे सर्पमित्र, असा गैरसमज वाढत आहे. यामुळे भामटेगिरी वाढते. चांगले काम करणार्‍यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. तसेच नागरिकांमध्ये सापांबरोबरच सर्पमित्रांबद्दल भितीचे वातावरण पसरत आहे.गैरप्रकार करणार्‍यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. पप्पू जमादार, सर्पमित्र
पैशासाठी अडवणूक
सहा महिन्यांपूर्वी कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथील वस्तीवर सर्प निघाला. एका सर्पमित्राला बोलावले. त्याने साप पकडला आणि तो विषारी असल्याचे सांगत सोडण्यासाठी दीड हजार मागितले. आम्ही 100-200 रुपये देऊ केले. पण त्याने 500 रुपये आग्रह धरून पैसे घेतलेच. अनिल बिराजदार, गावकरी