सोलापूर- सामाजिक वनीकरण विभागातर्फे स्मृती उद्यानात उभारण्यात येणार्या नक्षत्र वनामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. वनस्पती शास्त्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता उद्यानाची मदत होईल, असे सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक अशोक पाटील यांनी सांगितले.
जागतिक वन दिनानिमित्त शुक्रवारी स्मृती उद्यानात उभारण्यात आलेल्या नक्षत्र वनामध्ये निसर्गप्रेमींच्या हस्ते औषधी रोपं लावण्यात आली. या वेळी सुभेदार बाबूराव पेठकर, नेचर कॉन्झव्र्हेशन सर्केलचे भरत छेडा, आदित्य क्षीरसागर, प्रतीक तलवाड, सिद्धेश्वर प्रशालेतील हरित सेना शिक्षक शिवानंद हिरेमठ यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी, आदी उपस्थित होते.
उपसंचालक पाटील म्हणाले, ‘नक्षत्र उद्यानमध्ये 12 राशींच्या 27 नक्षत्रांचे आराध्यवृक्ष लावण्यात येत आहेत. झाडांच्या काही प्रजातींची रोपं महाराष्ट्रात आढळतच नसल्याने त्या इतर राज्यातून मागण्यावत येतील. वनस्पती शास्त्राच्या अभ्यासकांसह, निसर्गप्रेमींना त्या झाडांची शास्त्रीय माहिती, औषधी गुणधर्मांची माहिती फलकांवर लावण्यात येईल. याच परिसरात निसर्ग परिचय केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये सोलापूरसह राष्ट्रीय पातळीवरील आढळणारे वन्यजीव, वनस्पतींची छायाचित्रांसह माहिती प्रसिद्ध करण्याचे काम सुरू आहे. स्मृती उद्यान हे वन पर्यटनासाठी येणार्या नागरिकांसह, विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती मिळणारे ठिकाण म्हणून विकसित होईल’. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचार्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सवलतीच्या दरात औषधी रोपं
सामाजिक वनीकरण केंद्रामध्ये घराच्या परिसरात लावण्यासाठी औषधी रोपं सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बदाम, महानिंब, कडीपत्ता, बेल, वड, गुलमोहर, सोनमोहर, कडूनिंब, करंज या सारखी रोपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दाट सावली देणारी व इमारतींना धोका न होणारी रोप स्मृती उद्यानात आहेत.
पर्यटन स्थळ विकसीत
स्मृती वनात नटलेली गर्द हिरवाई, विविध वृक्षसंपदा, निसर्गरम्य परिसर यामुळे पर्यटनासाठीच नव्हे तर निसर्ग अभ्यासासाठीही हे स्थळ उपयुक्त असे ठरत आहे. निसर्गप्रेमींकडून या परिसराला पसंती तर मिळत आहेच पण येथील विविध उपक्रमांमुळे सोलापुरात उत्तम पर्यटन स्थळही विकसीत झाले आहे, हे यानिमित्त अधोरेखित होते.