आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक करणार्‍यांकडूनच भरपाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे जिल्ह्यात आठ दिवसांपासून शांततापूर्ण तणाव आहे. तीन दिवसांपूर्वी मंगळवेढा, मोहोळ, टेंभुर्णी, कुडरुवाडी, पंढरपूर या भागात बसवर दगडफेक झाली. बंद पाळून कुणी दगडफेक केली अथवा बंद पाळण्यासाठी कुणी भाग पडले त्यांचा शोध घेत आहोत. दरम्यान, शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई संबंधित व्यक्तीकडून वसूल करू. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव देणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी दिली.
जिल्ह्यात शांतता आहे. बाजारपेठा सुरू आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या घटनांमध्ये 86 जणांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवस पोलिस कोठडी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. रानडे म्हणाले, ‘बंद अथवा त्या काळात शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची बंद पुकारलेल्या अथवा नुकसान केलेल्यांकडून भरपाई घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
त्यानुसार आगामी काळात संपूर्ण माहिती घेऊन प्रस्ताव तयार करण्यात येईल. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये पुढील कार्यवाही होईल. व्हॉटस्अँप, ई-मेल, फेसबुक या माध्यामातून काही आक्षेपार्ह मजकूर आल्यास तो डिलिट करा अथवा पोलिसांना सांगून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा. म्हणजे तो मेसेज पुढे जाणार नाही आणि त्याचा प्रसारही होणार नाही. जनतेच्या पैशातूनच शासन मालमत्ता उभारते. एसटी बसेस फोडणे म्हणजे आपलेच नुकसान आहे. आपला पैसा चांगल्या पद्धतीने वापरायला नको का?