आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव निवळला; फुलल्या बाजारपेठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोशल मीडियावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह मजकुराचे पडसाद शहरात उमटले. सामाजिक संस्था, संघटनेचे कार्यकर्ते निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर आले. या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झाल्याने रविवारी बाजारपेठा बंद होत्या. त्या सोमवारी सुरू झाल्या. ग्राहकही बाहेर पडल्याने सकाळपासून गर्दी जाणवत होती.
अतिशय संवेदनशील समजल्या जाणार्‍या नव्या पेठेतील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. एरवी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान बंद होणारी नवीपेठेतील बाजारपेठ सोमवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरुच होती. पुढील आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने शैक्षणिक साहित्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत खरेदीचा हंगाम सुरूआहे. त्यातच फेसबुकवर महापुरुषांची विटंबना, त्यामुळे तणाव, किरकोळ दगडफेक या कारणांमुळे गेल्या आठवड्यात चारवेळा बाजारपेठा बंद ठेवण्याची वेळ शहरातील व्यापार्‍यांवर आली होती. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. त्या बंदमुळे व्यापार्‍यांचे नुकसान व ग्राहकांची गैरसोय झाली.

सोमवारी सकाळी उशिरापर्यंत बाजारपेठा उघडण्यास सुरवात झाली. काही व्यापार्‍यांनी एकमेकांना मोबाइलवरून संपर्क साधत वातावरणाचा अंदाज घेत होते. सकाळी अकरा वाजल्यानंतर सर्व बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर आली. कुटुंबीयांसह कपडे, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात ग्राहक मग्न असल्याचे चित्र सोमवारी नवीपेठेत दिसून आले.