आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिगत राहून जागृती केली, गुलबर्गा तुरुंगात झाली रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर केली अन् त्यावेळी काँग्रेस विरोधातील चार प्रमुख राजकीय संघटनांनी एकत्र येऊन आणीबाणीला विरोध केला. भूमिगत राहून चळवळ सुरू केली. मात्र, काही काळाने पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले, अशी आठवण तत्कालीन समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते शंकर पाटील यांनी सांगितली.
पाटील यांनी आणीबाणी काळातील आठवणी जागवल्या. त्यांनी सांगितले की, आम्ही समाजवादी चळवळीत काम करीत होतो. मी यदुनाथ थत्ते यांच्या नेतृत्वाखाली मराठी, कन्नड इंग्रजीतून बुलेटीन काढून लोकांमध्ये जागृती करण्यासाठी ते वाटत होतो. त्यासाठी पुण्यापासून ते कर्नाटकातील काही भागात भूमिगत राहून फिरत होतो. सोलापुरात तर मी पूर्व भागातील झोपडपट्टीत रहात होतो, आणीबाणीत आम्हाला भूमिगत राहून काम करावे लागले, त्यामुळे कोणी ओळखू नये म्हणून काळजी घेत होतो.
सोलापुरात कसब्यातील फडके वाड्यातून आमचे काम चालायचे. पुण्यात तर सार्वजनिक ठिकाणी राहून कोणी ओळखणार नाही याची काळजी घेत. थत्ते यांना भेटून बुलेटीन तयार करीत असत. ते लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी होती. ती जबाबदारी पार पाडत असतानाच पोलिसांचा ससेमिरा चुकविण्याच्या प्रयत्नातच आळंद येथे माझ्यासह काहीजणांना अटक झाली. आम्हाला गुलबर्गा जेलमध्ये ठेवले.
तुरुंगातील अनुभव
तुरुंगात माझ्याबरोबर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जे. एच. पटेल, डॉ. व्ही. टी. देऊळगावकर अशी ज्येष्ठ मंडळी होती. लोकांना संघटित करण्याचे काम केल्याने पोलिसांनी आम्हाला अटक केली होती. प्रमुख राजकीय संघटना जनसंघ, समाजवादी, मोरारजी देसाई यांचा सिंडिकेट काँग्रेस आणि चरणसिंग यांचा क्रांती दल आदी पक्ष-संघटना एकत्र आल्या होत्या.
निवडणुकीत सक्रिय
पुढे १९७७ मध्ये आणीबाणी उठवली आणि आम्ही बाहेर पडलो. आणीबाणी उठवल्यानंतर निवडणुका लागल्या. त्यावेळी या संघटना पुन्हा वेगवेगळ्या झाल्या. जनता पक्ष समोर आला. सोलापुरातून अप्पासाहेब काडादी यांना जनता पक्षाचे तिकीट मिळाले. त्यांच्या प्रचारात आम्ही कार्यरत राहिलो. देशात मुरारजी देसाई यांचे सरकार आले.
बातम्या आणखी आहेत...