आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहम प्लाझाची झाली आयुक्तांसमक्ष मोजणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विजापूर रस्त्यावरील सोहम प्लाझा इमारतीच्या जागेची मोजणी करून दोन आठवड्यांत शासनाकडे अहवाल द्या, असा आदेश नगरविकास खात्याने महापालिकेस दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी 11.30 वाजता महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासह शासनाने नियुक्त केलेल्या समितीने सोहम प्लाझाची मोजणी केली. बांधकाम परवानगीपेक्षा पाच मीटर फ्रंट मार्जिनला बांधकाम केल्याचा अहवाल शासनाकडे तत्काळ पाठवून दिला.

श्री. गुडेवार यांनी साडेचार महिन्यांच्या काळात शहरात अनेक बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. प्रत्यक्ष कोणत्या ठिकाणी गेले नव्हते. सोमवारी सोहम प्लाझाच्या मोजणीवेळी ते स्वत: हजर होते, त्यांनी समिती सदस्यांबरोबर काम केले.

पाच मीटर फ्रंट मार्जिन आणि स्टोअरऐवजी दुकाने
महापालिका बांधकाम परवानगीपेक्षा पाच मीटर फ्रंटला बांधकाम केल्याचे मोजणीत निदर्शनास आले. याशिवाय तळघरात स्टोअरसाठी परवानगी असताना दुकाने असल्याचे मोजणीत निदर्शनास आले.

मोजणी प्रक्रियेत होते हे अधिकारी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्गाचे चंदरकी, नगररचना विभागाचे माने, नगरअभियंता गंगाधर दुलंगे, उपअभियंता आर. डी. जाधव, अभियंता इर्शाद जरतार.

मोजणीच्या वेळी बघ्यांची झाली गर्दी
सोहम प्लाझाची मोजणी करण्यासाठी आयुक्त गुडेवार स्वत: गेल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. आयुक्त येणार असल्याने त्या परिसरात सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती.

मग अंतिम ले-आऊटचे काय?
सोहम प्लाझाचे बांधकाम तीन प्लॉटावर आहे. त्याचा अंतिम ले-आऊट नाही. प्राथमिक ले-आऊट असल्याचा नगररचना विभागाकडून अभिप्राय आहे. त्या जागेवरील ले-आऊटची तपासणी होणे आवश्यक आहे.

अहवाल पाठवला
राज्य सरकारच्या आदेशानुसार सोहम प्लाझाच्या जागेची मोजणी केली. त्याचा अहवाल पाठवला आहे. पाच मीटर फ्रंट मार्जिन बांधकाम आहे. स्टोअरच्या जागेत दुकाने आहेत.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका