आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलमट्टीच्या पाण्यासाठी पत्रव्यवहार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आलमट्टी (कर्नाटक) धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी मिळणारच आहे. त्या सरकारशी पत्रव्यवहार झाला आहे. उजनी धरणातून काही दिवसांपूर्वीच औज बंधार्‍यात पाणी पोहोचल्याने 40 दिवसांपर्यंत पाण्याची टंचाई तूर्तात मिटली आहे. पण, पुढील पंधरा दिवसांनी पुन्हा पाठपुरावा करून पाणी मिळवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी येथे दिली. जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमधील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सोमवारी संपर्क कार्यालयात ‘जनता दरबार’ घेतला. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते.

जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीवर

जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीवर र्शी. ढोबळे यांनी भाष्य केले. जिल्हाधिकारी म्हणून गोकुळ मवारे यांनी चांगले काम केल्याची प्रशस्ती त्यांनी दिली. तर महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांच्या हतबल कामकाजाविषयी टीका केली. ते म्हणाले की, शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नांबाबत आयुक्त गंभीर नाहीत. काही नगरसेवकांच्या आक्रमकपणासमोर ते हतबल आहेत. भूमिगत गटार योजनेची 45 किलोमीटरची कामे अपेक्षित असताना फक्त 20 किलोमीटरची झाली आहेत. उजनी धरणातून पाकणीपर्यंत पाणी वेगाने येते. पण, पुढे त्याचा वेग कमी आहे. ते पाणी जुळे सोलापूरला मिळण्यासाठी नवी जोडलाइन टाकण्याचे नियोजन आवश्यक आहे. कचरा व्यस्थापन होत नाही, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री ढोबळेंची माहिती
दुष्काळाला तोंड देण्यासाठी सर्वपक्षीय अध्यक्षांच्या बैठका घेणार

दुष्काळामुळे सोलापूर महोत्सव रद्द, कीर्तन, भावगीत कार्यक्रमांचा विचार

प्रादेशिक पाणीपुरवठय़ाचे 67 टक्के वीज बिल सरकारने भरण्याची मागणी

राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांसाठी 3 फेब्रुवारीला पन्हाळ्यात होणार शिबिर

‘तो मी नव्हेच..’

अधिकारी माझे ऐकत नाहीत, असे मी कधीच म्हणालो नाही. माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या त्या बातम्या ‘टेबल न्यूज’ आहेत, असे सांगत पालकमंत्री ढोबळे यांनी ‘तो मी नव्हेच’ असे जाहीर केले. मला खूप काही अधिकार असून जे अधिकारी माझं ऐकत नाहीत, त्यांच्यासह त्यांच्या सचिवांना माझ्या दालनात बोलावून त्यांना मी सांगू शकतो. त्यानंतर समाधन न झाल्यास कॅबिनेटच्या बैठकीत मी स्पष्ट नाराजी व्यक्त करू शकतो, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

धवलसिंहांची कड

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जिल्हा परिषद सदस्य डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी टीका केली होती. त्याविषयी विचारले असता र्शी. ढोबळे यांनी धवलसिंहांची कड घेत सारवासारव केली. धवलसिंह यांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत ते तळमळीपोटी बोलले असल्याचा दावाही र्शी. ढोबळे यांनी केला. ते म्हणाले की, पवार साहेबांना अडचणीचे ठरणारे विधान केले नसून त्यांचे विधान तळमळीपोटी आहे. उद्देश वाईट नाही. पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतल्यामुळे तसे बोलले असतील. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा खर्च 13 हजार कोटी रुपये असून ती पूर्ण होण्यासाठी 24 हजार कोटी रुपये लागतील, असेही ते म्हणाले.