आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात रिक्षांचे नवे मीटर बंद, कारवाईचे ‘मीटर’ चालू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील सुमारे 50 टक्के रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महिनाभराच्या मोहिमेमुळे हे शक्य झाले आहे. मात्र, रिक्षाचालक मीटर बंदच ठेवत असल्याने प्रवाशांना त्याचा लाभ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मीटर बंद ठेवणार्‍या रिक्षाचालकांवर आता ‘आरटीओ’च्या कारवाईचे ‘मीटर’ चालू करण्याचे संकेत आहेत.

जुलैच्या 1 तारखेपासून मोहीम सुरू झाली. तीत 2500 हून अधिक रिक्षांना नवे मीटर बसवण्यात आले आहेत, तर विनापरवाना 700 रिक्षा जप्त केल्या. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी म्हणून राज्य सरकारने सर्व परमिट रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याच्या निर्णय घेतला. दंडातून सात लाखांचा महसूल आरटीओला मिळाला.


आरटीओला माहिती द्या
नवे मीटर लावण्याची मोहीम सुरूच राहील. मात्र, तेवढय़ावर थांबणार नाही. त्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्न होतील. त्यासाठी खास मोहीम सुरू करण्यात येईल. प्रवाशांनी मीटर असलेल्या रिक्षातूनच प्रवास करावा. चालकांनी मीटर चालू करण्यास नकार दिला अथवा मीटर बंदची कारणे दिल्यास त्याची माहिती आरटीओकडे द्यावी.
- दीपक पाटील, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

नवे मीटर शोभेच्या वस्तू
रिक्षाचालक केवळ परमिट मिळविण्यापर्यंत अथवा आरटीओची दंडात्मक कारवाई टाळावी इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीटरचा वापर करीत आहेत. ते केवळ शोभेची वस्तू असल्याचे भासवत आहेत. रिक्षांत प्रवासी बसल्यानंतर मीटर बंद ठेवूनच त्यांची वाहतूक सुरू आहे. मीटर बसवल्यानंतर तो बंद ठेवणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे. प्रवाशाने मीटरविषयी हटकल्यास चालक मनाला वाटेल ते उत्तर देत आहेत.

तक्रारीसाठी स्वतंत्र व्यवस्था
‘आरटीओ’ने बंद मीटरच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी खास दूरभाष क्रमांक जारी करण्याचे ठरवले आहे. तसेच इंटरनेटचाही वापर करण्याचा इरादा अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. रिक्षाभाडे किंवा अन्य काही तक्रार असल्यास तीही यावर नोंदवता येईल. तक्रारीवरून संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.