आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सोलापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद; मनपा आयुक्त यांची बदली रद्द करण्यासाठी पाळण्यात आला होता बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजप-शिवसेना, माकप आणि बसपने पुकारलेल्या ‘सोलापूर बंद’ला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. चाटी गल्ली, फलटण गल्ली, मधला मारुती, टिळक चौक या मुख्य बाजारपेठांमध्ये त्याचा प्रभाव जाणवला नाही. मध्यवर्ती व्यापारपेठ असलेल्या नवी पेठेत सकाळी काही दुकाने बंद होती. दुपारी मात्र सर्व दुकाने उघडली गेली. फक्त विडी आणि यंत्रमाग उद्योग बंद होते. या उद्योगातील कामगारांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

लोकाभिमुख प्रशासन राबवणार्‍या गुडेवार यांची तडकाफडकी बदली झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांनी त्याबद्दल चीड व्यक्त केली. त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भाजप-शिवसेना, माकप आणि बसपच्या नेत्यांनी गुरुवारी ‘बंद’ची हाक दिली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चाही जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन दिले. सामान्यांच्या हिताचे काम करणार्‍या गुडेवारांची बदली राजकीय हेतूने झाली. त्याच्या विरोधातील हा लोकक्षोभ शासनापर्यंत पोचवा, असे त्यांनी सांगितले.