आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्या शहर बंदची हाक, पण जोश हरवलेला; भाजप-सेना, बसप, माकप रस्त्यावर उतरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीप्रकरणी महापालिकेतील विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांचा उत्साह मावळल्यासारखा दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी गुडेवार यांच्या राजीनाम्याच्या घटनेनंतर याच घटकांनी रस्त्यावर उतरून प्रचंड विरोध केला होता. मात्र, आता प्रत्यक्ष बदली झाली असतानाही केवळ दिखाऊ विरोध होत आहे. मंगळवारी शहर व महापालिकेत सामसुमता होती. विरोधकांनी केवळ दिखाऊ विरोध करत पत्रकार परिषद घेत गुरुवारी सोलापूर बंदची हाक दिली. दुसरीकडे नवे आयुक्त अजित जाधव यांच्याशी असलेली आपुलकी लक्षात घेता विरोधकांचा जोश हरवल्यासारखा दिसत आहे.
गुडेवार यांच्या बदलीप्रकरणी मंगळवारी सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनीच राजकीय हेतूने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली केली. ती रद्द होण्यासाठी गुरुवारी (दि. 26) ‘सोलापूर बंद’ पुकारल्याचे सांगण्यात आले.

आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी, बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, भाजपचे नगरसेवक अशोक निंबर्गी यांनी पत्रकार परिषद घेतली. गुरुवारी दुपारी 4 वाजता महापालिकेवर मोर्चा नेणार असल्याचेही ते म्हणाले. श्री. आडम यांनी माजी गृहमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदार कन्या प्रणिती शिंदे यांनीच गुडेवारांना घालवल्याचा आरोप केला. दोघांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला होता. त्यामुळेच वर्षाच्या आत गुडेवारांना सोलापूर सोडावे लागल्याचे ते म्हणाले.

चांगल्या अधिकार्‍यांना घालविण्याचा हा राजकीय घाट असल्याचे श्री. चंदनशिवे म्हणाले. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मोर्चा काढणार असून, सामान्य नागरिकांनीही त्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष प्रताप चव्हाण यांनीही थेट आरोप केला. काँग्रेस भवनच्या बाहेर अनधिकृतरीत्या लावलेल्या डिजिटल फलकामुळे गुडेवारांनी प्रकाश यलगुलवार यांना 20 हजार रुपयांचा दंड केला. तिथेच प्रकरण चिघळले. गुडेवारांच्या बदलीचा घाट घातला गेला, असे ते म्हणाले. त्यात सुशीलकुमार शिंदे, आमदार शिंदे, दिलीप माने आदींचा हात असल्याचेही चव्हाण म्हणाले.
आमदार प्रणिती शिंदे यांचे बदललेले वक्तव्य

तेव्हा - सप्टेंबरमध्ये गुडेवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार शिंदे म्हणाल्या होत्या गुडेवार यांचे काम शहर विकासाचे आहे. त्यात कुणी अडथळ आणला तर तो देशद्रोह ठरेल.
आता - गुडेवारांची बदली ही नियमानुसार आहे. त्यात शिंदेसाहेबांचा काहीही संबंध नाही. यापूर्वी झालेल्या बदल्या आम्हीच रद्द करायला लावल्या. पण आता त्यांच्याहून सक्षम अधिकारी अजित जाधव यांना आणत आहोत.
भाजपने तोंड उघडले
भाजपचे आमदार देशमुख यांनी मौनच बाळगले होते. कुठल्याही भावना व्यक्त करत नसल्याने पत्रकारांनीच त्यांना छेडले. शेवटी ते म्हणाले, ‘हो, यात शिंदे यांचाच हात आहे. गुडेवार कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. अशा अधिकार्‍यांची सोलापूरला गरज आहे. परंतु राजकीय आकसापोटी त्यांची बदली झाली. याचे वाईट वाटते.’
बदलीचे राजकारण विरोधक करत आहेत
४गुडेवारांनीच स्वत:हून बदली करण्याची विनंती केली होती; त्यानुसारच ही बदली झाली. शिंदेसाहेब कुणाच्या बदलीच्या भानगडीत पडत नाहीत. उलट आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे गुडेवारांना संरक्षण मिळाले होते. आरोप करणार्‍यांनी या बाबी पडताळून पाहाव्यात. कुठल्याही मुद्द्यांवर राजकारण योग्य नाही. भाजपचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनीच गुडेवारांना उद्देशून बोलले की, ते व्यापार्‍यांचा सन्मान करत नाहीत. हे त्यांचे वागणे थांबले नाही, तर रस्त्यावर उतरावे लागेल, असे म्हणाले होते. किमान या वक्तव्याचा तरी भाजपला विसर पडू नये.
प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष काँग्रेस
कोण आहेत अजित जाधव
2011 मध्ये सोलापूर महापालिकेत उपायुक्त होते. त्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून काम पाहिले. थंड डोक्याने काम करण्याची पद्धत. कुठल्याही कामासाठी घाई नाही. सर्वपक्षीय नगरसेवकांना अपेक्षित कामे करणारा. पदाधिकार्‍याच्या कामात अडथळे आणणार नाहीत. अगदी सोलापूर महापालिकेची नस ओळखून काम करणारी व्यक्ती. ते होते तेव्हा आयुक्त म्हणून काही जाणवले नाही. गेले तेव्हाही काही कळले नाही.