आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत ; तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर शिफारसी सुचवू; हाळवणकर समितीसमोर मांडणार मागण्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वस्त्रोद्योगात तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशने मोठी प्रगती केली. त्याच धर्तीवरच्या सुविधा, सामूहिक प्रकल्पांच्या शिफारसी राज्य सरकारला करणार असल्याचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी त्यांची समिती नियुक्त केली. त्याबाबत ते बोलत होते.

‘सरकारच्या बहुतांश सवलती सहकार तत्त्वावर असणाऱ्या संस्थांना आहेत. विकेंद्रित स्वरूपात असणाऱ्या वस्त्रोद्योगाकडे कधीच जाणीवपूर्वक पाहिले गेले नाही. त्यामुळे हा उद्योग नेहमी अस्थिर असतो. दुसरीकडे सहकार तत्त्वावरील सूतगिरण्यांमध्ये राजकारण शिरले, गैरप्रकार झाले. त्यामुळे या संस्था डबघाईला आल्या. या संस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यात थेट परकीय गुंतवणूक आणण्याचा विचार आहे. तशी शिफारस करेन. त्यामुळे उत्पादन सुरू होईल, शिवाय रोजगारही मिळेल.’

‘यंत्रमागांच्या छोट्या घटकांना ऊर्जितावस्था देण्यासाठी मागांचे आधुनिकीकरण हाच पर्याय आहे. त्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. केंद्र राज्याच्या अर्थसाहाय्यातून ‘रॅपिअर लूम’ सुरू झाले, की जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील अशी उत्पादने घेता येतील. एकाच छत्राखाली उत्पादनांची वेगवेगळी प्रक्रिया करणे, मालाचे मार्केटिंग करणे म्हणजेच ‘टेक्स्टाइल हब.’ जे छोट्या यंत्रमाग घटकांना आवश्यक आहेत, असेही श्री. हाळवणकर म्हणाले.

लोक प्रतिनिधींचे काम
^सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी एक संधी चालून आलेली आहे. त्याला सामोरे जाऊन पदरात पाडून घेण्याचे काम आता लोकप्रतिनिधींचे. खासदार भाजपचे, दोन आमदारही त्याच पक्षाचे. त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून ‘टेक्स्टाइल हब’ या शहराला मिळवून द्यावे.” अंबादास बिंगी, टॉवेलउत्पादक

उद्योगाला उभारी मिळेल
^कापड गिरण्या, सूत गिरण्या असताना सोलापूर त्याचे मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते. त्या बंद पडल्याने आता बकाल झालेल्या या शहरात राहिलेले उद्योगही मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यांना उभारी देण्याची संधी आता आली. ‘टेक्स्टाइल हब’ म्हणून या शहराला सुविधा दिल्यास वस्त्रोद्योगाला उभारी येईल.” जगदीश प्रसाद खंडेलवाल, निर्यातदार'
सोलापूर होईल ‘टेरिटॉवेल हब’
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या वस्त्रोद्योगा विषयी नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये घोषणा केल्या. राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या महिन्यातच वस्त्रोद्योग धोरणाची फेररचना करण्यासाठी हाळवणकर समिती नियुक्त झाली. या समितीकडून ‘टेक्स्टाइल हब’च्या सुविधा मिळाल्या तर सोलापूर ‘टेरिटॉवेल हब’ होईल. जगाच्या पटलावर पुन्हा एकदा सोलापूर येईल, असा विश्वास उत्पादकांनी व्यक्त केला.