आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप पक्षांतर्गत निवडणूक कासवगतीने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भारतीय जनता पक्षाच्या पक्षांतर्गत पदाधिकारी निवडी लांबणीवर पडल्या आहेत. शहरातील 35 प्रभागांच्या निवडणुकाच अजून झालेल्या नाहीत. त्यामुळे मंडल निवडणुका रखडल्या आहेत. मंडलच्या निवडणुका झाल्यानंतर शहराध्यक्षाची निवडणूक होणार आहे. जानेवारीअखेर या सर्व निवडी अपेक्षित होत्या. आता या निवडींना फेब्रुवारीतच मुहूर्त मिळेल, असे सांगितले जात आहे.

पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीबाबतचा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला होता. जवळपास 51 प्रभागांतून या निवडी पहिल्या टप्प्यात होणार होत्या. त्यापैकी केवळ 16 प्रभागांच्या निवडी झाल्या आहेत. त्यातही निम्म्यापेक्षा जास्त प्रभाग अध्यक्षांच्या निवडी शहर उत्तर विधानसभा मतदार संघातल्याच आहेत. अन्य 35 प्रभाग अध्यक्ष निवडणुका रखडल्या आहेत. त्यासाठी अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. त्यानंतर मंडलाध्यक्ष निवडी होतील. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाकडून आंदोलने केली जात आहेत. 30 रोजी जिल्हाभर आंदोलन आहे, त्याची तयारी करण्यात येणार असल्याने आता आठवडाभर प्रभाग निवडीही लांबल्या आहेत. शहराध्यक्ष देशमुख यांनी प्रभाग निवडी लवकर करून घ्या, अशा सूचना स्थानिक पदाधिकार्‍यांना दिलेल्या तरीही निवडी लांबणीवर पडल्या आहेत. त्याचीही चर्चा पक्षात होत आहे. अन्य जिल्ह्यांतील निवडी झाल्या आहेत. सोलापूर मागे पडल्याचे सांगितले जाते.

देशमुखांचे वेगळे प्रयत्न
आगामी विधानसभा निवडणूक पाहता ‘शहर उत्तर’ची जागा कायम राखण्यासाठी याच मतदारसंघाकडे पद असावे, असा प्रयत्न विद्यमान अध्यक्ष, आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याबाबतही मार्चमध्ये निर्णय अपेक्षित आहे. हे पदही शहर उत्तरमध्येच ठेवले जाईल, अशी अटकळ सध्या बांधली जात आहे. सोलापुरातील या रखडलेल्या निवडीबाबत प्रांतिक पदाधिकारीही गप्प कसे? अशी विचारणा काही कार्यकर्ते करीत आहेत. पक्षांतर्गत वेगवेगळ्या मुद्दय़ांवरून नाराजी आहे. अनेकवेळा मतभेदही समोर आले आहेत. त्यामुळे ऐनवेळी गटबाजीचे राजकारण उफाळून येण्याची शक्यता आहे.

चर्चेत काही नावे
शहराध्यक्ष पदासाठी प्रा. मोहिनी पतकी, प्रा. अशोक निंबर्गी, विक्रम देशमुख, पांडुरंग दिड्डी, सुरेश पाटील, प्रकाश मारता यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूक लांबत असल्याने इच्छुकांची यादीही लांबत चालली आहे.

प्रक्रिया सुरू
प्रभाग आणि मंडलाध्यक्ष निवड झाल्याशिवाय नवीन शहराध्यक्षाची निवड करता येणार नाही. ती लवकरच होईल. प्रक्रिया सुरू आहे.’’ विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष