आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur BJP Leadr Comment On Lal Krishna Advani Resignation

लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनाम्यावर बोलक्या प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनाम्याने सोलापूर भाजपलाही धक्का बसला आहे. भाजपचे जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी व नेत्यांनी पक्ष व अडवाणी यांच्यात मतभेद असतील तर ते अपसूक निवळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यांनी त्याग केला
अडवाणी हे राष्ट्रीयस्तरावरील नेते आहेत. त्यांनी देश आणि पक्षासाठी मोठा त्याग केला. त्यांना पक्ष आणि समाजमनात मानाचं स्थान आहे. मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काय बोलणार. त्यांच्या निर्णयाचा धक्का बसला आहे. सुभाष देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष

पुन्हा जोमाने कामाला लागतील
अडवाणी यांनी दिलेला राजीनामा गैरसमजुतीतून दिलेला आहे. त्यामुळे हे वादळ पुन्हा शमणार आहे. त्यांनी भाजपमध्ये असंख्य कार्यकर्ते घडवले. ते भाजप सोडू शकत नाहीत. पक्षात त्यांचा व्यापक विचार होईल. ते राजीनामा मागे घेतील व पुन्हा जोमाने कामाला लागतील. आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष, भाजप

ही जोडी असणार आहे
पक्षात अडवाणी आणि मोदी ही जोडी आहे. अडवाणी यांनी दिलेला राजीनामा काही काळापुरता आहे. त्यांची समजूत पक्षातील नेते काढतील. त्यांचे मार्गदर्शन आणि मोदींचे नेतृत्व यामुळे 2014 मध्ये केंद्रात सत्ता येईल. प्रसन्न तानवडे, जि. प. सदस्य

अडवाणींचा सल्ला महत्त्वाचा
अडवाणी यांनी घेतलेला निर्णय पक्षहितासाठी दुर्दैवी असला तरी ते निर्णय बदलतील. पक्षाच्या विनंतीनुसार ते राजीनामा मागे घेतील, अशी आशा आहे. त्यांचा सल्ला पक्षाला महत्त्वाचा आहे. त्यामुळे केंद्रात सत्ता येणार आहे. बैठक सुरू आहे, त्यातून चांगला निर्णय बाहेर येईल. शहाजी पवार, भाजप जिल्हाध्यक्ष

समजूत काढतील
अडवाणी यांनी राजीनामा दिला तरी बैठक सुरू आहे. त्यांची समजूत नेते काढतील. त्यामुळे ते राजीनामा मागे घेतील. आम्ही कार्यकर्ते त्यांच्या राजीनामा परतीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. ते आमच्याबरोबर कायम राहतील. रोहिणी तडवळकर, नगरसेविका

पक्षाला राष्ट्रीय प्रतिमा दिली
अडवाणी यांनी पक्षाला राष्ट्रीय प्रतिमा दिली. ते जणू देवघरातील देव आहेत. आमचा देव घरातून जाणार नाही. त्यांची समजूत पक्ष काढेल. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षासाठी काम करून केंद्रातील सत्ता मिळवून द्यावी. शिवानंद पाटील, नगरसेवक

पक्षात कायम राहतील
अडवाणी यांनी तीन पदांचा राजीनामा दिला आहे. ते पक्षात आहेतच. ते 1942 पासून देशासाठी योगदान देत आहेत. त्यानी रथयात्रा काढून पक्ष वाढवला. ते पक्ष सोडणार नाही. शरद बनसोडे, भाजप प्रदेश सदस्य

राजीनामा मागे घेतील
अडवाणी यांच्याशिवाय भाजप अधुरा आहे. त्यांनी दिलेला राजीनामा भाजपच्या हिताआड येणारा आहे. ते निश्चितच राजीनामा मागे घेतील. पक्ष विरोधात ते काम करणार नाहीत. पांडुरंग दिड्डी, नगरसेवक

पक्ष बाहेर येईल
भाजप हा लोकशाहीवादी पक्ष आहे. प्रत्येक पक्षात राजकीय कुरघोडी असतातच. सर्व अडचणीतून पक्ष चालत असला तरी त्यातून बाहेर येईल. अविनाश कोळी, संघटन मंत्री

पेल्यातील वादळ
अडवाणी यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला जाणार नाही. त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्यासाठी केंद्रातील नेते प्रयत्न करतील.अडवाणी यांचा राजीनामा पेल्यातील वादळ आहे. जगदीश पाटील, नगरसेवक