आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीओटीं’च्या पाच प्रकल्पांच्या कामांत त्रुटी, महापालिकेचा अद्याप अहवाल नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील बांधा, वापरा आणि हस्तांतर करा (बीओटी) या तत्त्वावरील पाच प्रकल्पांच्या कामांत त्रुटी आढळली आहे. याविषयी अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी फेब्रुवारीला दिले होते. महापालिका प्रशासनाने अद्याप अहवाल दिलेला नाही.

शहरात शुभराय आर्ट गॅलरी पाडून तेथे व्यापारी संकुल, सात रस्ता बस डेपो येथे डेपो आणि व्यापारी संकुल, होटगी रोड येथील ईदगाह मैदान शेजारी व्यापारी संकुल, 27 नंबर शाळा येथे व्यावसायिक कार्यालये, राजूबाई मॅटर्निटी येथे हॉस्पिटल आणि वाणिज्य संकुल बांधणे प्रस्तावित आहे. तर 27 नंबर शाळा, राजूबाई मॅटर्निटी, शुभराय आर्ट गॅलरी या ठिकाणचे वर्क ऑर्डर दिले. त्यानुसार काम सुरू आहे. शासनाने पाच प्रकल्पाच्या कामात त्रुटी काढल्या असून, कामात बेकायदेशीरपणा दिसून येत असल्याचे प्राथमिक निष्कर्षात दिसून येते. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने मागवला होता.

उत्तर आले नाही
बीओटीवर राबवण्यात येणार्‍या प्रकल्पात काही त्रुटी काढून महापालिका आयुक्तांना सात फेब्रुवारी रोजी पत्र दिले. सात दिवसांच्या आत त्यांचा अहवाल मागवला. पण, अद्याप उत्तर आले नाही. सोमवारी महापालिकेला स्मरणपत्र देण्यात येणार असल्याचे नगरपालिका शाखेकडून सांगण्यात आले.

काँग्रेस शहराध्यक्षाचा आंदोलनाचा इशारा
परिवहनच्या जागेवरील प्रकल्पास सत्ताधारी काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी विरोध केला आहे. महापौर अलका राठोड यांना पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. जागा दिल्यास फ्रंटल आणि सेलचे पदाधिकारी आंदोलन करतील, असे भोसले यांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे.

सोमवारी पुन्हा पत्र देतो
बीओटी प्रकल्पास आमचा विरोध नाही. पण, सदरची जागा महापालिकेने विकसित करावी. जुन्या दरानुसार काम केल्यास तोटा होणार आहे. त्यामुळे आमचा विरोध आहे. सोमवारी पुन्हा पत्र देणार आहे.’’ धर्मा भोसले, काँग्रेस शहराध्यक्ष
समितीपुढे विषय ठेवणार
परिवहन डेपोवर बीओटीच्या कामास शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी विरोध दर्शविणारे पत्र दिले आहे. सदरचा विषय समन्वय समितीपुढे ठेवून निर्णय घेणार आहोत. पक्षादेश पाळून काम करण्यात येईल.’’ अलका राठोड, महापौर
पत्र आल्याचे पाहून सांगतो
काही प्रकल्प महापालिकेच्या जागेत आहेत. अन्य ठिकाणी उभारण्यात येणार्‍या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची मान्यता घेतली जात नाही. महापालिकेस पत्र आले असल्यास त्याबाबत पाहून सांगतो.’’ अजय सावरीकर, महापालिका आयुक्त

जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते आदेश, अनियमितता झाल्याची शंका, चार महिन्यानंतरही महापालिका कार्यालयाने दिले नाही उत्तर

शासनाने काढल्या त्रुटी
कार्यपद्धतीचा अवलंब नाही.
महापालिकेची मान्यता घेतली नाही
जागा ताब्यात येण्यापूर्वी निविदा प्रक्रिया
काही प्रकरणाचे वर्क ऑर्डर दिले.