आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहप्रकल्प विकसक अनिल पंधे यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रीय स्तरावरील नामवंत गृहप्रकल्प विकसक पंधे उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी संचालक अनिल वसंतराव पंधे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सोलापुरातील काळजापूर मारुती मंदिरानजीकच्या राहत्या घरापासून गुरुवारी (७ मे) सकाळी वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. पंधे यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे मामा असा परिवार आहे. बांधकाम क्षेत्रात व्यावसायिक मूल्यांची जोपासना करीत सोलापूरसह देशभर सामान्यांचा जीवनस्तर उंचावणार्‍या गृहप्रकल्पाचे विकसक म्हणून पंधे यांची ख्याती होती.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या कॉ. गोदूताई परूळेकर महिला विडी कामगारांच्या गृहप्रकल्पाचे ते विकसक होत. जिनिव्हाच्या कामगार परिषदेत या गृहप्रकल्पाचा गौरव झाला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यानिमित्ताने पंधे यांचा सन्मान केला होता. सुनामीग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी केंद्र शासनाने पंधे ग्रुपवर सोपवली होती. कारनिक, निकोबार, हटबे बेटांवर गृहप्रकल्प, चर्च शाळांच्या इमारती त्यांनी विकसित केल्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच पंधे यांचे पितृछत्र हरपले होते.

लिमका बुकमध्ये नोंद
अल्पावधीत लोकमंगल साखर कारखाना उभारणीची लिमका बुकमध्ये नोंद झाली होती. तसेच डिस्टिलरी प्लँट, युगांडा येथे ओव्हेन फॉल्स एक्सटेन्शन प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांतून त्यांनी सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले.

पंधे ग्रुपची वैशिष्ट्ये
आधुनिक बांधकाम शास्त्राचा आधार घेऊन अल्पावधीत कमी खर्चातील गृहबांधणी. हैदराबादचे ईआयबी, कोलकात्याचे एनटीसीजे विद्यापीठ, नेहरू सायन्स सेंटर, जोधपूर डेव्हलपमेंट अथॉरिटी अंतर्गत अपना घर योजना आदी विविध प्रकल्प यशस्वीपणे तडीस.