आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंहगड संस्थेने बांधल्या बेकायदा पाच इमारती, महापालिका पथकाची तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिंहगड संस्थेने पाच इमारती बेकायदा बांधल्याचे बुधवारच्या पाहणीत स्पष्ट झाले. तसेच तब्बल 14 इमारतींच्या बाबतीत नियमांची पायमल्ली झाल्याचेही पुढे आले आहे.
महापालिकेने संस्थेस 25 इमारती बांधण्यास सशर्त परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात 30 इमारती बांधण्यात येत आहेत. त्यापैकी 14 इमारतींचे बांधकाम अनियमित आहे. तीन इमारतींना वापर परवाना असताना पाच इमारती पूर्णपणे तर 13 इमारतीत विनापरवाना अर्धवट वापर सुरू आहे. बांधकाम परवाना विभागाचे दीपक भादुले यांच्या पथकाने बुधवारी तपासणी केली. त्यास सुमारे तीन तास लागले.
संस्थेच्या बेकायदा बांधकामाची तक्रार आल्याने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी समिती नेमून तपासणीचे आदेश दिले होते. समितीचे प्रमुख साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे, प्रभारी नगर अभियंता दीपक भादुले, आर. डी. जाधव, बी. बी. भोसले यांच्या पथकाने पाहाणी व मोजणी केली. बेकायदा बांधकाम असल्याची तक्रार नगरसेवक जगदीश पाटील व नागेश वल्याळ यांनी केली होती. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी चौकशी समिती नियुक्ती केली होती.

आमचे म्हणणे सादर करू
आम्ही रीतसर बांधकाम केले आहे. काही इमारतीचे रिवाज बांधकाम परवानगीसाठी अर्ज आहे. मनपा समितीने अहवाल तयार केला तरी आमचे म्हणणे महापालिकेसमोर मांडू. आमचे म्हणणे त्यांनी ऐकून घ्यावे.’’ वारीस कुडले, सिंहगड इस्टेट सुपरवायझर

अहवाल आल्यावर कारवाई
सिंहगडप्रकरणी समिती नियुक्त केली आहे. अहवाल माझ्यापर्यंत आला नाही. तो आल्यावर नेमकेपणाने काही सांगता येईल. होटगी रस्त्यावरील मोठय़ा इमारतींचा वरचा मजला बेकायदा बांधलेला आहे. प्राथमिक तपासात हे निदर्शनास आले आहे.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका

बिगरशेती नसताना बांधकाम
संस्थेस 25 इमारतींचा बांधकाम परवाना 2007-2010 पर्यंत नियम व अटी घालून देण्यात आला. मागीलवर्षी त्यांनी बांधकाम परवाना नूतनीकरणासाठी सादर केला होता. पण, सदर भूखंडाला बिगरशेती (एनए) प्रमाणपत्र नसल्याने परवाना दिला नाही, अशी माहिती बांधकाम परवाना विभागप्रमुख भादुले यांनी दिली.

कर आकारणीत दरवर्षी 37 लाख
संस्थेच्या वतीने महापालिकेस दरवर्षी करापोटी 37 लाख रुपये उत्पन्न मिळते. 13 इमारतीवर आकारणी सुरू आहे. तर अन्य दोन इमारतींची आकारणी करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

एनमार्ट इमारतीचा मजला बेकायदा
होटगी रस्त्यावरील मोहिते नगरजवळील एनमार्टसाठी बांधलेल्या इमारतीचा वरचा मजला बेकायदा असल्याची माहिती मिळाली आहे. सदरची जागा कोणाची आहे, त्याबाबत अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई महापालिका करणार आहे.