आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यवर्ती बसस्थानकाचा प्रश्न कोणत्याही स्थितीत मार्गी लावू - विजय देशमुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रवाशांना सुविधा देण्यासाठी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाची जागा कमी आहे. पुणे नाका येथे असलेल्या एसटीच्या जागेत नवे आधुनिक पध्दतीचे बसस्थानक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होत आहेत.
पुणे नाका येथील बसस्थानकाचा प्रश्न कोणत्याही स्थितीत वर्षात मार्गी लावू, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिले.

गुरुवारी सोलापूर विभाग नियंत्रक कार्यालयाच्या आवारात शिवसेना प्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने विजयकुमार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर आमदार नारायण पाटील, शिवसेनेच शहर प्रमुख प्रताप चव्हाण, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे -पाटील, पंढरपूर विभागाचे प्रमुख धनंजय डिकोळे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, महेश धाराशिवकर उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्याची आर्थिक स्थिती सांगितली. एसटीची आर्थिक स्थिती चांगली नाही तरीही प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यास एसटी प्रशासन कटिबद्ध आहे. प्रवाशांना एसटीकडून उत्तम सुविधा मिळाली पाहिजे. एसटीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या बाबींचा विचार करण्यात येत आहे. जाहिरातीच्या माध्यमातून अर्थप्राप्ती करण्यासाठी मोठे प्रयत्न करणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश अवस्थी यांनी केले. कार्यक्रमाला एसटी कर्मचारी संघटनेचे विविध पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
दोन बसस्थानकांची गरज
मध्यवर्ती बसस्थानकाची जागा कमी असल्याने पुणे नाका येथे नवे मोठे बसस्थानक बांधण्याची नितांत गरज आहे. शहराचा विस्तार होत असल्याने विजापूर नाका परिसरात एक बसस्थानक उभारणे आवश्यक आहे. विजापूर नाका परिसरात बसस्थानक उभारल्यास नागरिकांना शहरातील मुख्य बसस्थानकात येण्याची गरज नाही. त्यामुळे दोन बसस्थानक उभारणे महत्त्वाचे आहे.