सोलापूर - यंदा २६ जानेवारी रोजी राज्यभर होणारे सर्व मुख्य शासकीय समारंभ एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.१५ वाजता होणार आहेत. यावेळी ध्वजवंदन आणि समारंभपूर्वक संचलन करण्यात येईल. प्रजासत्ताक दिनाला उत्सवाचे रूप आणण्यासाठी अनेक सांस्कृतिक देशभक्तिपर कार्यक्रमांची आखणी करण्याच्या विशेष सूचनाही राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे सोलापूरसह राज्यात एकदाच जन-गण-मन आवाज घुमणार आहे. राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे.
अधिकाधिक लोकांना मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी प्रजासत्ताक दिनास सकाळी ८.३० ते १० या वेळेत ध्वजारोहण किंवा इतर कोणतेही शासकीय आणि निमशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. एखादे कार्यालय किंवा संस्थेला ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास सकाळी ८.३० वाजण्याच्या पूर्वी किंवा १० वाजण्याच्या नंतर करावा लागणार आहे.
शहरात जास्तीत जास्त भागाचा अंतर्भाव करून संचलन, शिक्षण विभागाच्या कक्षेत येणाऱ्या संस्थांनी प्रजासत्ताक महोत्सव म्हणून साजरा करावा. त्यानिमित्त विविध सामुदायिक कार्यक्रम आयोजित करावेत. तसेच इतर संस्थांनी देशभक्तिपर कार्यक्रम आयोजित करावेत.