आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा डेपोत अजोरा टाकलाच नाही; तळेहिप्परगा तलाव परिसर बुजविण्याचा प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील कचरा हटवण्याचा मक्ता घेतलेल्या समीक्षा कंपनीने उचलेल्या कचर्‍याचे वजन केल्याचे महापालिकेतील नोंदीवरून स्पष्ट होते. परंतु वस्तुस्थिती तशी नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे. भोगाव येथील कचरा डेपोत अजोरा न टाकता तो हिप्परगा तलाव परिसरातील खाणींमध्ये टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली.

महापालिका आणि समीक्षा कंपनीकडे कचर्‍याचे वजन करण्यासाठी काटा नाही. त्यामुळे बायोएनर्जी कंपनीकडे असलेल्या काट्यावर वजन करत असल्याचा देखावा केला जातो. वजनकाट्याच्या ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश दिला जात नाही. पाहणीसाठी गेले असता तेथील सुरक्षारक्षकांनी अरेरावी केल्याने कचर्‍याच्या वजनाविषयी संशय निर्माण झाला आहे.

दरम्यान, समीक्षा कंपनीचा मक्ता रद्द करावा, या मागणीसाठी बुधवारी माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्त्वाखाली मनपा आयुक्त कार्यालयात बसपा आणि माकपाचे नगरसेवक बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. ही माहिती नगरसेवक चंदनशिवे यांनी दिली. समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीस महापालिकेने दहा वर्षांसाठी 114 कोटी रुपयांना मक्ता दिला. तो बेकायदा असल्याने रद्द करण्याची मागणी होत आहे.

शहरातील अजोरा (माती) आमच्या गावच्या परिसरात आणून टाकण्यात येत असेल तर कोणीही त्यासाठी आमची परवानगी घेतलेली नाही. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता अजोरा टाकता येत नाही.’’ छाया काळे, सरपंच, तळेहिप्परगा

अजोरा डेपोत न टाकता तळेहिप्परगा परिसरातील खाणींमध्ये टाकण्यात आला आहे. रोजच्या रोज येणार्‍या कचर्‍याचे वजन केले जाते.’’ ए. आर. गायकवाड, आरोग्य निरीक्षक, भोगाव खत डेपो

दगड खाणीत अजोरा
शहरातून उचलेला अजोरा तळेहिप्परगा परिसरातील दगड खाणींच्या खड्डय़ात टाकण्यात येत आहे. कचरा टाकण्यापूर्वी वजन होणे आवश्यक असताना ते केले जात नाही. त्यामुळे उचलेल्या अजोर्‍याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आगामी काळात पावसामुळे त्या ठिकाणी दलदल निर्माण होणार आहे.

वजनाबाबत संशय
कचर्‍यांचे वजन करावे असा नियम असताना वजन केल्याचा बनाव केला जात आहे. बायोएनर्जी कंपनीत असलेला एक वजनकाटा बंद असल्याचे सांगण्यात आले. दुसरा काटा आहे तोही संशयास्पद. गाडीचे एकूण वजन केल्यानंतर खुल्या गाडीचे वजन करणे आवश्यक असते. पण ते केले जात नाही, असे दिसून आले.