आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलवाहिनींचे नकाशेच नाहीत ; पाइपलाइन शोधण्यासाठी रस्त्यांवर घेतले गेले अनेक खड्डे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनींची यंत्रणा अजूनही ब्रिटिशकालीन आहे. लोकसंख्यावाढीमुळे यामध्ये कालांतराने काहीप्रमाणात बदल होत गेले. जे बदल झाले त्या जलवाहिनींचा तक्ताच पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नसल्याने जलवाहिनी दुरुस्तीस पाणीपुरवठा विभागालाच वारंवार त्रास सोसावा लागत आहे. जलवाहिनी शोधण्यासाठी अनेक ठिकाणी खोदलेल्या खड्डय़ांमुळे रस्त्यांची आधीच दयनीय असलेली अवस्था आणखी वाईट होत आहे.
15 वर्षांपासून वाहिनी कोरडीच - जुळे सोलापुरातील न्यू संतोष नगरमधल्या र्शीकृष्ण जावडेकर यांनी 15 वर्षांपूर्वी नळ कनेक्शन घेतले. प्रारंभी कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. काही महिन्यानंतर नळाला पाणीच आले नाही. याबाबत वारंवार सांगूनही पाणीपुरवठा विभागाने ही समस्या सोडवली नाही. पाणी न मिळूनही जावडेकर हे रितसर पाणीपट्टी भरत आहेत. ही गोष्ट तेथील नगरसेवक नरेंद्र काळे यांना समजताच त्यांनी पाणीपुरवठा अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता धक्कादायक बाब समोर आली. उत्तमप्रकाश खंदारे यांच्या आमदारकीच्या काळात फे ब्रुवारी 2002 मध्ये येथे मुख्य जलवाहिनीला एक दुसरी जलवाहिनी जोडण्यात आली होती. याला तेव्हा 1 लाख 57 हजार 100 रुपये खर्च आला होता. मात्र ती जलवाहिनी अद्यापही कोरडीच आहे. काळे यांनी ही बाब अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ही समस्या सोडवण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांकडून जलवाहिनीची शोधमोहीम सुरू करण्यात आली. आठवडाभर शोधमोहीम सुरू असूनही पाणीपुरवठा विभागाला जलवाहिनीचा पत्ता लागला नाही. अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले. कर्मचार्‍यांचा भरपूर वेळ वाया जात आहे आणि समस्याही सुटलेली नाही.
न्यू संतोषनगर येथील जलवाहिनीचे काम हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या बांधकाम विभागाकडून झाले आहे. काम झाल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी या कामाची लेखी माहिती महापालिकेला देऊन त्यांच्याकडे त्या जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र या जलवाहिनीबाबत माहिती नसल्याची खोटी माहिती महापालिका उपअभियंता आर. एन. रेड्डी यांनी दिली.
गाडेकरांनी माहिती देण्यास केली टाळाटाळ - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता संतोष गाडेकर यांना सोमवारी जलवाहिनीबाबत विचारले असता त्यांनी मंगळवारी माहिती देण्याची हमी दिली. मंगळवारी विचारले असता त्यांनी ड्राफ्समन डी. डी. शालगर यांच्याकडे पाठवले. शालगर यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती दिली. अधिक माहितीसाठी त्यांनी पुन्हा गाडेकर यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी सर्वासमक्ष शालगर यांना झापले. माहिती मिळत नसेल तर काय करायचे, दोन-तीन दिवसात देतो म्हणून सांगा, असे उत्तर देऊन टाळाटाळ केली. या वेळी महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता अहिरे हे सुद्धा उपस्थित होते.
कर्तव्यदक्ष शालगर आणि भोसेकर - गाडेकर यांनी आवाज चढवून बोलल्यानंतर शालगर यांनी न खचता शाखा अभियंता पी. एच. भोसेकर यांच्याशी संपर्क साधला. भोसेकर यांनी त्यावेळचे कनिष्ठ अभियंता एस. व्ही. जवळेकर यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. जवळेकर यांनीही सविस्तर माहिती दिली. ‘आमदार निधीतून काम पूर्ण झाले की दुसर्‍या दिवशी त्याच्या माहितीसह हे काम महापालिकेकडे वर्ग करण्यात येते. सध्या मी पुण्यात आहे. सोलापुरात असतो तर याची पाहिजे ती माहिती दिली असती,’ असे ते म्हणाले. जलवाहिनीचा शोध घेतल्यानंतर विविध ठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे व यामुळे इतरांच्या नळाचे पाइप तुटून वर आले आहेत.

पाणी न घेताही पाणीपट्टी - मी या भागात 23 वर्षांपासून राहत आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत कधीच मुबलक पाणी मिळाले नाही. पाणी न मिळताही आम्ही पाणीपट्टी भरत आहोत. अनेकांना सांगून आम्ही थकलो. नगरसेवक नरेंद्र काळे हे आमची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर शेवटची आशा आहे.’’ र्शीकृष्ण जावडेकर, नागरिक
कामाची भोंगळ पद्धत - पाणीपुरवठा विभागाकडे जलवाहिनीचा तक्ताच नसल्याने समस्या सुटत नाहीय. पाणीपुरवठा विभागाच्या कामाची पद्धत किती बेजबाबदारपणाची आहे, ते यावरून स्पष्ट होते.’’ नरेंद्र काळे, नगरसेवक, भाजप
लगेच कशी मिळणार ? न्यू संतोषनगर येथील जलवाहिनीची माहिती आमच्याकडे नाहीच. महाराष्ट्र प्राधिकरणाकडे आहे (आठ दिवसांपूर्वीचे उत्तर). महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे त्या जलवाहिनीची माहिती लगेच मिळू शकत नाही. तर आमच्याकडे लगेच कशी मिळणार. ते आमच्याकडे किरकोळ माहिती देतात.’’ आर. एन. रेड्डी, उपअभियंता, महापालिका