आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर शहरातील पायाभूत विचार न करताच झाले रस्ते मोठे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात 2003-2004 मध्ये एमएसआरडीसीच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठे रस्ते झाले, त्यानंतर दुभाजक असलेले रस्ते शहरात होऊ लागले. रस्ते रुंदीकरण करताना पायाभूत विचार कागदावरच ठेवून महापालिकेने कामे पूर्ण केली. त्यामुळे रस्ते होऊन दहा वर्षे झाली तरीही विद्युत पोल आहे तेथेच आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर, काही ठिकाणी फूटपाथवर मध्येच, काही ठिकाणी चौकाच्या वळणावर आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच पण या विद्युत दिव्यांच्या पोलचा, डीपींचा आडोसा घेऊन फूटपाथवर अतिक्रमणही होऊ लागले आहे.

शहरात रस्त्यावर अडथळे आणणारे किंवा फूटपाथवर मध्येच असलेले सुमारे 215 विद्युत दिव्यांचे पोल स्थलांतरित करावयाचे आहेत. त्यासाठी महावितरणने इस्टिमेट तयार करून दिले आहे. ते महापालिकेला सादर केले आहे. महापालिकेने त्यावर काम सुरू करणे आवश्यक होते. पण, महापालिकेने आर्थिक बोजा नको म्हणून ते बाजूलाच ठेवल्याची स्थिती सध्या आहे. त्यामुळे जिकडे तिकडे रस्ते मोठे झाले तरी वाहतुकीसाठी ते छोटेच दिसू लागले आहेत. महापालिका आणि महावितरण यांच्यात पूर्वी समन्वय होता. शहरातील विद्युत सार्वजनिक (रस्त्यावरील) दिव्यांची देखभाल महापालिकेकडे आहे. रस्ते रुंदीकरण करताना पूर्वी रस्त्याच्या कडेचे पोल स्थलांतरित करण्यासाठी महापालिका महावितरणला संपूर्ण खर्चाचे पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचे, अशी पद्धत होती. पण, नंतर महावितरणने या प्रकरणातून अंग काढून घेतले. मात्र अशा कामांसाठी ते कसे करायचे, त्याचा खर्च किती, ते काम कसे झाले पाहिजे यासाठी ‘मार्गदर्शका’च्या भूमिकेत महावितरण अजूनही आहे. महावितरणला त्यासाठी सुपरव्हीजन चार्ज द्यावा लागतो. पण पालिका उपयोग करून घेत नसल्याचे दिसते.

या रस्त्यांवर विद्युत पोल, डीपींचे अडथळे
सात रस्ता ते रंगभवन, स्टेशन, डफरीन चौक ते रंगभवन, रंगभवन ते सिव्हिल, जोडबसवण्णा चौक, वालचंद अभियांत्रिकी या नवीन रस्त्यांवरील पोल तसेच आहेत. यापूर्वी एमएसआरडीसीने केलेल्या पांजरापोळ चौक , सम्राट चौक , रूपाभवानी रोड, दयानंद महाविद्यालय, जुना बोरामणी नाका, शांती चौक , पॉलिटेक्निक कॉलेज, वालचंद अभियांत्रिकी, अशोक चौक पोलिस चौक ी, गेंट्याल चौक , गुरुनानक नगर, जुना होटगी नाका चौक , इएसआय रुग्णालय, आसरा चौक, तसेच भुलाभाई चौक ते जुना बोरामणी नाका.

विचार नाहीच
रस्त्यांची कामे पूर्ण करण्यापूर्वी त्याचा पायाभूत विकास करणे आवश्यक आहे. कामे करण्यापूर्वी ड्रेनेज लाइन, पाइपलाइन, विद्युत पोल, अंडरग्राऊंड केबल वायरिंग ही कामे करून घेणे आवश्यक असते. महापालिकेची कामे उलट दिशेने चालू आहेत. पहिल्यांदा रस्ते आणि मग नंतर पायाभूत विकास असे चित्र सध्या शहरात दिसते आहे. जिकडे-तिकडे रस्ते खोदलेले दिसतात. विद्युत दिवे आहेत तेथेच रस्त्याला अडथळे करून आहेत.
खांब हलवण्याच्या कामांचा परिसरनिहाय खर्च
तुकाराम चौक ते जुना कुंभारी रोड (40 पोल, 13 लाख 75 हजार)
भद्रावती रोड ते आकाशवाणी (39 पोल, 10 लाख 10 हजार)
माळी नगर-विकास नगर (30 पोल, 17,33,000)
सात रस्ता ते लष्कर (अंडरग्राऊंड केबल, 44,48,000)
कस्तुरबा मार्केट ते कोंतम चौक, सोना हिरा चौक ते तुळजापूरवेस (22 पोल, 8 लाख)
मंगळवेढेकर चाळ, पत्रा तालीम, उत्तर कसबा (अंडरग्राऊंड, 10 लाख)
अशोक चौक पोलिस चौकी ते हेडक्वॉर्टर
(2 लाख, 70 हजार)
पारस इस्टेट ते पंजाब तालीम, किल्लावेस (अंडरग्राऊंड वायरिंग, 78 लाख)
सिव्हिल चौक ते जोडबसवण्णा चौक
(1 लाख 66 हजार)
रूपाभवानी ते रा ष्ट्रीय महामार्ग, बलिदान चौक ते माणिक चौक , लष्कर ते काँग्रेस भवन, बेगम पेठ, राजस्व नगर रोड, कुंभारवेस ते जोडभावी पेठ (118 पोल, डीपी, पाच कोटी, 47 लाख, 4हजार 183)

इस्टिमेट फायलीतच
रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वी जानेवारी, फेब्रुवारी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2013 रोजी महावितरणने महापालिकेला जवळपास 15 कोटी रुपयांच्या कामांचे इस्टिमेट दिले आहे. ते महापालिकेच्या दप्तरी आहे. तेवढा खर्च नगरोत्थानमधूनच करावयाचा आहे. महापालिकेने खासगी ठेकेदार नेमून हे पथदिवे, डीपी स्थलांतर, अंडरग्राऊंड वायरिंगची कामे करून घ्यायला हवीत, पण ती झालेली नाहीत.
कामांसाठी 15 कोटी
रस्त्यांना अडथळे ठरणारी सार्वजनिक विद्युत यंत्रणा सुधारण्यासाठी जवळपास 15 कोटी रुपये तरी लागतील. तेवढा निधी महापालिकेकडेही नाही अन् महावितरणकडेही. दोन्ही यंत्रणा आमच्याकडी निधी नाही असे सांगतात. त्यामुळे शासनाने डीपीसीच्या माध्यमातून हा निधी दिला तर ही कामे लवकर मार्गी लागतील.

आडोसा घेत अतिक्रमण
शहरात बहुतेक ठिकाणी फूटपाथवर जेथे डीपी आहे, तेथे त्याचा आडोसा घेऊन अनेकांनी अतिक्रमण करून कोणी खोकी टाकली आहेत, कोणी त्याचा व्यावसायिक वापर करीत आहे. त्यामुळे फूटपाथ हे केवळ नावालाच दिसत आहेत.

देखभाल त्यांचीच...
विद्युत दिव्यांची देखभाल किंवा त्याची सर्व कामे महापालिकेनेच करावयाची आहेत. त्यासाठी महावितरण इस्टिमेट तयार करून देते, तसेच काही चार्ज घेऊन सुपरव्हीजनही करते.’’
संजय साळे, अधीक्षक अभियंता, महावितरण

15 दिवसांत कामे
४नगरोत्थान योजनेतून रस्त्यांची कामे सुरू आहेत. अडथळे असणारे विद्युत खांब, डीपी स्थलांतराची कामे येत्या 15 दिवसांत होतील. यासाठी शटडाऊन घ्यावे लागते. शासकीय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयांशी संपर्क करावा लागतो. शटडाऊन मिळेल तशी कामे होतात.’’ आर. एम. परदेशी, साहाय्यक विद्युत अभियंता, मनपा

फोटो - ईदगाह मैदान, होटगी रस्ता