आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- शहरातील विविध चौकांतील सिग्नल दिवे महापालिकेने दुरुस्त केले असतानाही ते चालू करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात नाही. सर्व सिग्नल सुरू असून पोलिस ते ताब्यात घेत नाहीत, असे महापालिकेकडून सांगितले जात होते, तर सिग्नलचे दिवे बंद असल्याची तक्रार पोलिसांकडून केली जात होती. प्रत्यक्षात गुरुवारी महापालिकेकडून काही किरकोळ दुरुस्त्या वगळता बहुतांश दिवे सुरू असल्याचे दिसून आले. एकूण 11 पैकी दोन सिग्नल सुरू आहेत. उर्वरित नऊपैकी सात चौकांतील दिवे सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.
गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने एका जाणकारासह सिग्नल दिवे असलेल्या चौकांत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. महापालिका आणि पोलिस खात्यात सुरू असलेला लपंडाव त्यावेळी दिसून आला. गेल्या शनिवारी (दि. 19) ‘डीबी स्टार’मध्ये ‘सिग्नल दिवे नावालाच’ असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत महापालिकेने सिग्नल दिवे सुरू असल्याचा दावा केला होता.
काही तांत्रिक बाबींची (टायमर) कमतरता असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत शांती चौक, आम्रपाली चौक, संत तुकाराम चौक, शासकीय रुग्णालय चौक, महावीर चौक, आसरा, रंगभवन चौकाची पाहणी करण्यात आली. दिवे सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.
पोलिसांनी दिवे सुरू करून पाहावेत
सरस्वती चौक व डफरीन चौकात सिग्नल दिवे सुरू आहेत. शांती चौक, आम्रपाली चौकात सिग्नल यंत्रणा सुरू आहे. संत तुकाराम चौकात मात्र अतिक्रमण आहे. ते काढण्यास वेळ लागणार नाही. चौकात घाण पाणी साचल्याचे दिसले. आसरा चौकातही अतिक्रमण काढल्यास दिवे सुरू ठेवायला हरकत नाही. दिवे सुरू केल्यास आपोआप गर्दीही कमी होईल. पोलिसांनी सर्व चौकांतील दिवे सुरू करून पाहावेत. काही तांत्रिक चुका असतील तर दुरुस्त करून घ्यावेत. पण तसे प्रयत्न पोलिसांनी केलेले नसल्याचेच दिसून आले.
काय म्हणतात पोलिस अधिकारी
>टायमर व अन्य कामे करण्याची गरज आहे. कुठल्या चौकात किती वेळ दिवे (एका बाजूची वेळ) पाहिजे याची पाहणी करावी. पोलिसांना सोबत घेऊन दिवे सुरू करावे आणि ताब्यात द्यावे. दिवे सु्रू असल्यास आमचे कामही सोपे होईल.’’
अभिजित मोहिते, पोलिस निरीक्षक, दक्षिण विभाग
>यंत्रणा सुरू असली तरी काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाली पाहिजे. शांती चौकासाठी अनेक दिवांसापासून मागणी आहे. टायमर, सेटिंग चांगली पाहिजे. नव्याने दिवे लावताना पोलिसांचे काहीच ऐकून घेतले नाही. या सर्व त्रुटी दूर झाल्या पाहिजेत.’’
एस. एस. पाटील, पोलिस निरीक्षक, उत्तर विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.