आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे सभागृहनेते कोठे सेना उंबरठ्यावर, सभा उरकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - काँग्रेसचे सभागृहनेते महेश कोठे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मनपा सभा जणू एकतर्फी दिसून आली. या सभेतील 16 विषय किरकोळ चर्चा करून अवघ्या अर्ध्या तासात कधी नव्हे ते एकमताने मंजूर करण्यात आले.
एकूणच कोठे सेना प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याने सभा उरकली. विरोधीपक्षाने उपसूचना न मांडता एकमताने विषयास मान्यता दिली. जून आणि जुलै महिन्यातील तहकूब सभा मंगळवारी बोलावण्यात आली होती.

पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मिरवणूक मार्ग दुरुस्त न झाल्याने नगरसेवक अनिल पल्ली, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, श्रीकांचना यन्नम यांनी आक्रमक भूमिका घेत अधिका-यांना जाब विचारला. बुधवारी बैठक घेण्याची घोषणा महापौर अलका राठोड यांनी केल्यानंतर नगरसेवकांनी मवाळ झाले.

महापौर झाल्या आक्रमक
मनपा सभा सुरू होताच सभागृहात अधिकारी नाहीत यांची जाणीव नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी महापौर राठोड यांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी महापौरांनी उपस्थित अधिका-यांची यादी मागवली तर अन्य अधिका-यांना सभागृहात प्रवेश देऊ नका, असे सांगितले. प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे यांना आयुक्तांच्या आसनावर बसण्याचे आदेश दिले.

भाजपचे वादाचे पडसाद
सभागृह नेते महेश कोठे सूचना मांडत असताना विरोधी पक्षाकडून उपसूचना न मांडता बहुतेक विषय एकमताने मान्य केले. भाजपमधील अंतर्गत वादाचे परिणाम सभागृहात दिसून आले. भाजपच्या अनेक नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला नाही. मनपा सभेत विरोधीपक्षाची भूमिका बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पार पाडली.

आमदार विजय देशमुख यांना भेटले महेश कोठे
मनपा सभागृह नेते महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ‘मातोश्री’वर जाण्यापूर्वी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, नगरसेवक अविनाश पाटील, संजू कोळी, अमर पुदाले, शिवानंद पाटील, षडाक्षरी स्वामी, विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.
बुधवारी कोठे सेनेत येतील
- मनपा सभागृह नेते महेश कोठे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते दोन वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. त्यामुळे ते पक्षात येतील. त्यांना घेऊन मी मुंबईला जात असून, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवसेना, जिल्हाप्रमुख
मूळ शक्ती आमच्यासोबत :
महेश कोठे यांना पक्षात थांबविण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. वरिष्ठांनी लक्ष घातले होते. तरीही ते बाहेर पडले. पण, पक्षाचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे ही पक्षाची मूळशक्ती असून ती आमच्यासोबत आहे. प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष, काँग्रेस

आमचा विचारच नाही; तर राहायचे कशासाठी?
काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अनेकांना विधान परिषदेवर संधी दिली. परंतु त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणा-या विष्णुपंत कोठे यांना मिळवून देण्यात उदासीन राहिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मतदारसंघातून मी उभा होतो. त्या वेळी माझ्या विरोधात स्वकीयातूनच बंड झाला. त्यांना थंड करण्याची भूमिका बजावली नाही. माझ्या प्रचारासाठी आले नाहीत. या सा-या गोष्टींचा अर्थ काय घ्यायचा? आमचा काही विचारच होत नसेल तर काँग्रेसमध्ये राहायचे कशाला, असा प्रश्न महापालिकेतील सभागृह नेते महेश कोठे यांनी केला आहे. ते बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी मनातील खदखद ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.
प्रश्न : पण शिंदेसाहेब असे का वागत आहेत?
त्यामागे काय कारण असू शकेल?
कोठे : असे का वागत आहेत माहीत नाही. पण उज्ज्वला शिंदे यांच्या पराभवापासून त्यांच्यात बदल झालेला दिसतो. परंतु निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्यांच्या भावनाच समजून घेता येत नाही तर ते नेतृत्व कसे मान्य करावे? दुस-यांच्या ऐकण्यावरून होणारा अन्याय किती सहन करायचा?
प्रश्न : शिवसेनेतच जाण्याचा निर्णय का?
कोठे : शहर उत्तरची जागा भाजपकडे आहे. शिवसेनेकडून ‘ऑफर’ आली. ती स्वीकारली. सध्या मी एकटाच सेनेत जाईन. माझा हा निर्णय वैयक्तिक असून छातीवर दगड ठेवून घेतला आहे (डोळे पाणावलेले).

तात्या म्हणाले,सलामत रहे दोस्ताना हमारा..
या सर्व पार्श्वभूमीवर व्यथित झालेले ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे यांनी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत शिंदे यांच्या पाठीशी कायम असणार असल्याचे सांगितले. कोणी कुठेही गेले तरी शिंदे आणि मी एकच आहोत. मुलाच्या बंडखोर भावनांनी शिंदे यांच्या प्रती असलेली निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही. कुठले पद मिळाले नाही म्हणूनही मी नाराज नाही असे प्रांजळपणे ते बोलले.

ते म्हणाले, ‘‘1962 पासून मी काँग्रेसचा क्रियाशील सभासद आहे. 2004 मध्ये उज्ज्वलाताई शिंदे लोकसभा निवडणुकीत 5 हजार मतांनी पराभूत झाल्या. या घटनेपासून शिंदे कुटुंबीयांचा महेशबद्दल गैरसमज झाला. त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली. त्याच वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीचे नियोजन माझ्याकडे होते. त्या वेळी शिंदे 1 लाख मताधिक्क्याने विजयी झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे नियोजन मात्र वेगवेगळ्या व्यक्तींकडे सोपवण्यात आले होते. माझ्याकडे नियोजनच नव्हते. पण कोणाचाही पराभव झाला तर कोठेंनीच केला असा समज होऊन बसला आहे. इतके झाले तरी शिंदेंप्रती माझी निष्ठा कायम आहे.’’