सोलापूर- सोलापूर मतदार संघात सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाने काँग्रेसची धुळधाण उडाली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील चिंतन बैठकीस जिल्हास्तरावरील नेते गेले असताना सोलापुरातील काही कार्यकर्त्यांनी सारस्वत मंगल कार्यालयात शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी पक्षनिष्ठेवरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच दे दणादण झाली. खुच्र्या फेकून ऐकमेकांवर उगारल्याने दोघे जखमी झाले. यावेळी सिव्हिल ड्रेसवर असलेल्या पोलिसाला रेकॉर्डिंग का केले म्हणून धक्काबुकी झाली.
परिवहनचे माजी सभापती केशव इंगळे यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्ते सायंकाळी पाच वाजता चिंतनासाठी जमले होते. यावेळी पक्षनिष्ठा व प्रचारातील भागीदारी यावरून ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. बाचाबाचीचे रूपांतर थेट खुच्र्या फेकून हाणामारी करण्यात झाले. यामध्ये परिवहन समितीचे माजी सभापती केशव इंगळे व अविनाश जाधव जखमी झाले. बैठकीत शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजय दासरी, राजन कामत, बजरंग जाधव, अविनाश जाधव यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल चौकीत झाली. उपचारानंतर जखमींना सोडून देण्यात आले.
पोलिसांचा मोबाइल फोडला
बैठकीवेळी साध्या वेशात गुप्तवार्ता विभागाचे पोलिस हवालदार पाटकूल उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस ठाण्यास कळवले. स्वत:च्या मोबाइलमध्ये त्यांनी चित्रीकरण सुरू केल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की करत त्यांचा मोबाइल हिसकावून जमिनीवार आदळला. गोंधळ घालणार्या दोघांना सदर बझार पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवणे सुरू होते, पण गुन्हा नोंद झाला नव्हता.
काँग्रेसमध्ये धुसफूस उफाळली
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या दारुण पराभावाचे खापर ऐकमेकांवर फोडण्याचा खटाटोप काँग्रेसमध्ये सुरू आहे. पक्षाचा मीच कसा निष्ठावंत आहे हे दाखवण्याची धडपड सुरू झाली आहे. त्यातूनच शुक्रवारचा प्रकार घडला.
केवळ चार-दोन चापटा मारल्यात : धर्मा भोसले
मी मुंबईत प्रदेश कमिटीच्या बैठकीला आलोय. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना शिवीगाळ व अपशब्द वापरल्याने खर्या निष्ठावंतांना त्याचा राग आला. त्यामुळे त्यांनी मारहाण केली. घटनेची मी चौकशी केली आहे. कुणी जखमी झालेले नाही. केवळ चार-दोन चापटा मारल्यात. शनिवारी मी सोलापुरात आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. धर्मा भोसले, शहराध्यक्ष, काँग्रेस
भोसले, दायमांचे कारस्थान : अविनाश जाधव
आत्मचिंतन बैठकीला निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही सर्वजण पदांचे राजीनामा देऊन झालेल्या चुकांचा शोधा घेणार होतो. पण, शहराध्यक्ष धर्मा भोसले व सेवादलचे चंद्रकांत दायमा यांच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली, असा आरोप काँग्रेस एनएसयूआयचे सरचिटणीस अविनाश जाधव यांनी केला. भोसलेंनी दमदाटीसाठी माणसं पाठवलेली होती, असेही ते म्हणाले.
शहराध्यक्ष भोसले यांना बदलण्यासाठी खटाटोप
काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचे म्हटले होते. पण, काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीने शुक्रवारी तो मंजूर केला नाही. धर्मा भोसले यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी काँग्रेस अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. इंगळे, कामत, जाधव यांनी याकामी पुढाकार घेतल्याने आणि भोसले सर्मथकांनी सक्रियता दाखल्याने शुक्रवारी चिंतन बैठकीत गदारोळ झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.